नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत २४ लाख २३ हजार २३७ मतदारांची अंतिम यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. सर्वाधिक मतदार निफाड तालुक्यात असून, पेठ तालुक्यात सर्वांत कमी मतदारांची संख्या आहे. जिल्हा परिषदेच्या ७३ व पंचायत समितींच्या १४६ जागांसाठी येत्या २१ फेब्रुवारीला मतदान होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने दि. ५ जानेवारी २०१७ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीमधून प्रारूप यादी तयार केली होती. या यादीतून १२ जानेवारीला मतदारांची प्रारूप यादी जाहीर केली होती. या यादीवर प्रशासनाने हरकती मागविल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने हरकतींची दखल घेऊन त्यांची सुनावणी प्रक्रिया घेत आक्षेपार्ह प्रारूप मतदार यादीतून वगळले आहे. जिल्हा प्रशासनाने २१ जानेवारीला या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर केली. १५ तालुक्यातील गट व गणनिहाय ही यादी जाहीर करण्यात आली आहे. निफाड तालुक्यात सर्वाधिक १० गण असून, यासाठी तीन लाख २८ हजार ५६२ इतके मतदार आहेत. तर पेठ तालुक्यात केवळ दोन गट असून, यातील मतदारांची संख्या ही ७३ हजार ३५ इतकी आहे. अंतिम मतदार यादीतील सर्वच मतदार जिल्हा परिषदेच्या ७३ व पंचायत समितींच्या १४६ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अंतिम मतदार यादी त्या त्या तहसील कार्यालयात तथा उपविभागीय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांत प्रसिद्ध करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)तालुकानिहाय मतदारबागलाण- २ लाख ३३ हजार ३५३, मालेगाव- २ लाख ७१ हजार ४६८, देवळा- ९४ हजार ८१५, कळवण- १ लाख १७ हजार ९८७, सुरगाणा- १ लाख १४ हजार ३५४, पेठ- ७३ हजार ३५, दिंडोरी- १ लाख ९३ हजार २३१, चांदवड- १ लाख ४३ हजार ७१४, नांदगाव- १ लाख ३० हजार ९८१, येवला- १ लाख ५० हजार ६०४, निफाड- ३ लाख २८ हजार ५६२, नाशिक- १ लाख २६ हजार ७५७, त्र्यंबकेश्वर- ९६ हजार ८४, इगतपुरी- १ लाख ५० हजार ६७२ व सिन्नर- १ लाख ९७ हजार ६२०.
जिल्हा परिषदेसाठी सुमारे २५ लाख मतदार
By admin | Published: January 24, 2017 1:28 AM