नाशिक : केवळ शहरवासीयांचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झालेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीनंतर आता रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये ३८0 महिला, तर ४४१ पुरुष प्रत्यक्ष निवडणूक लढवित आहे. त्यात महिला ४६ टक्के तर पुरुषांचे प्रमाण ५४ टक्के आहे.प्रमुख राजकीय पक्षांचा विचार करता सर्वाधिक ६४ महिला उमेदवार शिवसेनेत तर त्या खालोखाल ६३ महिला भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत. त्या खालोखाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ५१, राष्ट्रवादीने २९, काँग्रेसने २६ महिलांना प्रतिनिधित्व दिले आहे.३३ टक्के महिलांचे आरक्षण आता ५0 टक्क्यावर गेल्याने महापालिकेच्या या निवडणुकीत मागील निवडणुकीच्या तुलनेत महिलांची संख्या निश्चितच वाढली आहे. नव्या प्रभाग रचनेमुळे १0९ ऐवजी १२२ नगरसेवकांची संख्या झाली आहे.पक्षीयदृष्ट्या भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यकारिणीत ६ आणि महिला आघाडीच्या स्वतंत्र कार्यकारिणीत सुमारे ३८ महिलांचा सहभाग आहे. त्यापैकी फक्त दोन महिला पदाधिकारी निवडणूक लढवत आहेत.काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यकारिणीत एकही महिला नाही, तर महिला काँग्रेस कार्यकारिणीत ४0 महिलांचा समावेश आहे. त्यापैकी १६ महिला निवडणुकीकरिता इच्छुक होत्या. त्यापैकी १0 महिलांना संधी देण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीत काही महिला आहेत. महिला आघाडीत सुमारे ५0 महिला असून, त्यापैकी ३ ते ४ महिलांना यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर कार्यकारिणीत महिलांना स्थान नसून ३५ महिलांची कार्यकारिणी आहे. त्यापैकी पाच इच्छुक होत्या आणि त्यांना उमेदवारी दिली असल्याचे सांगण्यात आले.