दत्ता महाले : येवलाशहराची आर्थिक बाजारपेठ अवलंबून असणाऱ्या पैठणीला नोटाबंदीनंतर गेल्या दोन महिन्यापासून उतरती कळा लागली असून, ऐन दुष्काळात तेरावा महिना म्हणून गेल्या दोन महिन्यात रेशमाचे भाव हजार ते बाराशे रुपयांनी वाढल्याने सिंगल व डबल पदर रेशमी पैठणीचे भाव १०० ते १२०० रु पयांनी घसरल्याने विणकरांची चिंता वाढली आहे. कच्चा मालाचे (रेशीम) भाव वाढले आणि पक्का मालाचे (पैठणी) भाव कमी झाल्याने पैठणीसह विणकरांचे अर्थशास्त्र बिघडले आहे. गेल्या दोन महिन्यात येवल्यासह परिसरातील सुमारे ३५०० हातमागापैकी ५०० ते ६०० हातमाग बंद पडले आहेत. पैठणीच्या अनेक कारागिरांच्या हाताला काम नसल्याने त्यांचे प्रपंच धोक्यात आले आहेत. नोटाबंदीपूर्वी रेशीम खरेदी-विक्रीचा व्यवहार मोठ्या प्रमाणावर रोखीत चालत होता. सध्या चिठ्ठीवर रेशमाचा व्यवहार चालत होता. परंतु नोटाबंदीच्या वातावरणात व्यापारी चेक देणे-घेणे असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे. पैठणी विक्रीचे चेक क्लिअरिंग व्हायला महिना उलटून जात आहे. शेतकऱ्याच्या कांद्याला जशी घसरण लागली आणि कांद्याचा वांधा झाला आणि शेतकरी अडचणीत आले तशीच परिस्थिती येवल्याच्या पैठणीबाबत सध्या झाली आहे. शहराची मुख्य बाजारपेठ ही कांदा व पैठणीवर अवलंबून आहे.
येवल्यात सुमारे ६०० हातमाग बंद
By admin | Published: February 19, 2017 1:09 AM