नाशिक : पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी दुर्गादास जाधव (३८, रा. आसरबारी, ता. पेठ) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश जे़ पी़ झपाटे यांनी मंगळवारी (दि़४) तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ विशेष म्हणजे घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली़ १० डिसेंबर २०१६ रोजी ही घटना घडली होती़
पेठ येथील आरसबारी येथे आरोपी दुर्गादास हा पत्नी जनाबाई व चार मुलींसह राहत होता़ मद्यपी असलेला दुर्गादास हा चारित्र्याच्या संशयावरून जनाबाईला सतत मारहाण करीत असे़ ९ डिसेंबर रोजी मध्यरात्री मद्याच्या नशेत त्याने पत्नीला बेदम मारहाण केली़ यामुळे कंटाळलेल्या जनाबाईने १० डिसेंबर २०१६ रोजी साडेसात वाजेच्या सुमारास स्वत:ला पेटवून घेतले. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला़ या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात पती दुर्गादास याच्या विरोधात विवाहितेचा छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़
न्यायाधीश झपाटे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात सरकारी वकील रेवती कोतवाल यांनी बाजू मांडली़ यामध्ये आरोपीच्या पंधरा वर्षीय मुलीने दिलेल्या साक्षीवरून शारीरिक व मानसिक छळाचा आरोप सिद्ध झाला़ आरोपी दुर्गादास जाधव यास तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़