नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय मतदार यादीतील गोंधळाबाबत मंगळवारी अखेरच्या दिवशी हरकतींचा पाऊस पडला. सदोष मतदार यादीमुळे सुमारे साठ हजार मतदार बाधित झाले असून, निवडणूक कक्षाकडे आतापर्यंत पथकप्रमुखांकडून ६० ते ७० अहवाल प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने भारत निवडणूक आयोगाने ५ जानेवारी २०१७ रोजी मान्यता दिलेली विधानसभेची मतदार यादी गृहित धरत प्रभागनिहाय मतदार याद्या तयार केल्या. सदर प्रारूप मतदार याद्या दि. १२ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येऊन त्यावर दि. १७ जानेवारीपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार, गेल्या सहा दिवसांत महापालिकेच्या निवडणूक कक्षाकडे हरकतींचा पाऊस पडला. सुमारे सातशे हरकती दाखल झाल्या. या हरकतींमध्ये प्रामुख्याने, एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात घुसविण्यात येण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच काही प्रभागांत मतदारांची केवळ आडनावेच मुद्रित झाली असून, त्यामुळे मतदारांची नीट ओळख पटेनाशी झालेली आहे, तर मतदार यादीतील नावांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका आहेत. सुमारे साठ हजार मतदारांबाबत गोंधळ झाला असल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे. महापालिका निवडणुकीसाठी १० लाख ७४ हजार मतदार आहेत. गोंधळामुळे बाधित झालेल्या मतदारांबाबत प्रशासनाने लगेचच उपआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या पथकांमार्फत तपासणी केली असता आतापर्यंत साठ ते सत्तर अहवाल प्राप्त झाल्याची माहिती सह निवडणूक अधिकारी व प्रशासन उपआयुक्त विजय पगार यांनी दिली. (प्रतिनिधी)
सदोष यादीमुळे सुमारे साठ हजार मतदार बाधित
By admin | Published: January 18, 2017 12:00 AM