सिन्नर - गेल्या ४८ दिवसांपासून सिन्नर आगाराची लालपरी ठप्प झाल्याने सुमारे ३ कोटी रुपयांचा फटका बसल्याचे दिसून येते. तीन दिवस एक फेरी सुरू करण्यात आली होती. मात्र, आता ती फेरीही बंद झाल्याने सिन्नर आगार पूर्णत: ठप्प असल्याचे चित्र आहे.
८ नोव्हेंबरपासून राज्य कर्मचारी सेवेत विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून राज्य परिवहन महामंडळाने संप पुकारला आहे. यात सिन्नर आगारातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. सुरुवातीला ४२४ कर्मचाऱ्यांपैकी मोठ्या प्रमाणात कर्मचारी संपात सहभागी झाले होते. आता ९ प्रशासकीय कर्मचारी, दोन चालक व तीन वाहक कामावर रुजू असून उर्वरित सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे सिन्नर आगाराला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
सिन्नर आगाराकडे ५६ बसेस आहेत. १९६ चालक, १४५ वाहक, ५२ यांत्रिकी सेवक तर १८ कारकून कार्यरत आहेत. कोरोनाच्या संकटानंतर दिवाळीपूर्वी या बसेस रस्त्यावर धावू लागल्या तेव्हा सिन्नर आगाराला दररोज साडेपाच लाखांचे उत्पन्न मिळू लागले होते. दिवाळीच्या दरम्यान भाडेवाढीला मंजुरी मिळाल्यानंतर रोजचे उत्पन्न आठ लाखांपर्यंत पोहोचले होते. एकाच दिवशी विक्रमी १२ लाखांपर्यंत उत्पन्न आगाराने मिळवले होते. जवळपास ३५ दिवसांपासून सुरू असलेल्या या संपामुळे आगाराला जवळपास ३ कोटींचा फटका बसला आहे. मध्यंतरी काही कर्मचारी कामावर हजर झाल्यानंतर आगारातील चार बसेस रस्त्यावर उतरल्या होत्या. सिन्नर-ठाणगाव व सिन्नर-नाशिक अशी बसफेरी सुरू करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर या फेऱ्या बंद झाल्या. आता टप्प्याटप्प्याने चारही बसेस बंद झाल्या असून आगारातील सर्व फेऱ्या ठप्प झाल्याचे चित्र आहे. सिन्नर आगाराची एकही बस रस्त्यावर नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
सिन्नर आगाराचे ग्रामीण भागात मोठे जाळे पसरले आहे. त्यामुळे आठवडे बाजारासह शाळा-महाविद्यालयात विद्यार्थी व नागरिकांना येण्यासाठी बसचा मोठा आधार होता. मात्र बससेवा सुमारे ४८ दिवसांपासून बंद असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ज्येष्ठ नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली असून राज्य शासनाने यातून तोडगा काढण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.