मालेगाव : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या व दहा वर्षांपूर्वी संचित रजेवर बाहेर आलेल्या व तेव्हापासून फरार असलेल्या आरोपी शेख अख्तर शेख गफूर यास बापू गांधी कपडा मार्केट परिसरात फिरताना आझादनगर पोलिसांनी दुपारी तीन वाजता अटक केली. सायंकाळी त्यास चाळीसगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारीच रुजू झालेले पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, पोलीस हवालदा अमोल शिंदे, प्रकाश बनकर यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरुन बापू गांधी कपडा मार्केट येथे शेख अख्तर शेख गफूर यास शिताफीने जेरबंद केले.पिंपरखेड (ता. चाळीसगाव) येथे शेतीच्या वादातून त्यांनी एकाची हत्त्या केली होती. या प्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात नजमोद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरुन २२ मे १९९३ रोजी शेख मुख्तार व इतर ११ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध दि. १३ आॅगस्ट १९९३ साली जळगाव सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी २१ सप्टेंबर २००५ रोजी आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नाशिक मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना १५ डिसेंबर २००७ रोजी पॅरोलवर बाहेर आला होता; परंतु संचित रजेचा कालावधी संपूनही तो कारागृहात हजर न झाल्याने शेख अख्तरविरोधात चाळीसगाव पोलिसांत गुन्हा दाखल आहे. (प्रतिनिधी)
खुनातील फरार आरोपीस अटक
By admin | Published: March 06, 2017 1:01 AM