नाशिक : शहरासह परिसरात काही भागांत बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, परंतु आंबा, द्राक्षांसह अन्य पिकांसाठी मात्र हा पाऊस व ढगाळ हवामान नुकसानकारक असल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.रविवारी दुपारपासूनच शहर व परिसरात ढगाळ हवामान निर्माण होऊन जोरदार वारे वाहत होते. अचानक आलेल्या वातावरणातील या बदलाने उकाड्याने हैराण नागरिकांना काही काळ दिलासा मिळाला. दरम्यान, सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास अचानक शहरासह उपनगरांमधील काही भागात पावसाने तुरळक हजेरी लावली. काही भागात मात्र पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. विशेषत: भगूर, नाशिकरोड, वडाळागाव, देवळाली कॅम्प, इंदिरानगर, सिडको, सातपूर आदि भागात पावसाने काही काळ जोरदार हजेरी लावली. शनिवारी राज्यातील काही भागात विशेषत: विदर्भातील वाशिम, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांत मुसळधार पावसाबरोबर गारपिटीचा तडाखा बसल्याने गहु, हरभरा, संत्री या पिकांचे मोठे नुकसान झाले. नाशिक शहरासह जिल्ह्यात असा पाऊस झाल्यास द्राक्ष, कांदा आदि पिकांचे नुकसान होऊ शकते. (प्रतिनिधी)
बेमोसमी पावसाची हजेरी
By admin | Published: February 28, 2016 11:26 PM