नाशिक: मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दहशतवादी अब्दुल कय्युम अन्सारी उर्फ अबू सालेम (वय ६२) याला काही दिवसांपुर्वीच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात डांबण्यात आले होते. त्याला एका खटल्याच्या न्यायालयीन कामकाजाकरिता दिल्ली सत्र न्यायालयात नाशिकरोड कारागृहातून कडेकोट बंदोबस्तात गुरूवारी (दि.१) मध्यरात्री नेण्यात आले. न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर सालेम यास पुन्हा मध्यवर्ती कारागृहात आणण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी व मुख्य सूत्रधार गँगस्टर दाऊद इब्राहीमचा हस्तक असलेला सालेम हा जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याला काही दिवसांपुर्वीच मुंबईतील तळोजा कारागृहातून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले आहे. येथील अंडा सेलमध्ये त्याला ठेवण्यात आले असून दिल्ली येथील न्यायालयात एका खटल्यात आरोपी असलेल्या सालेम यास सुनावणीसाठी हजर करण्यात आले आहे. न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर त्याला पुन्हा मध्यवर्ती कारागृहात आणले जाणार असल्याची माहिती कारागृह प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्याच्या नाशिक ते दिल्ली आणि नाशिक अशा रेल्वे प्रवासाबाबत नाशिक शहर पोलिस व कारागृह प्रशासनाकडून मोठी गोपनीयता आणि सतर्कता बाळगण्यात आली आहे. सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या सशस्त्र पोलिस पथकासह कारागृह प्रशासन आणि रेल्वे पोलिसांचाही विशेष बंदोबस्तात सालेमला रेल्वेच्या एका आरक्षित केलेल्या स्वतंत्र बोगीतून दिल्लीला नेण्यात आले.
मध्यरात्री अडीच वाजता कारागृहातून काढले
सालेमला मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास कारागृहातून कडेकोट बंदोबस्तात बाहेर काढण्यात आले. नाशिक शहर पोलिसांनी त्याचा ताबा घेत त्याला नाशिक रोडला रेल्वे स्थानकात आणले. यावेळी स्थानकाच्या आवारात तसेच फलाट क्रमांक-१वर सशस्त्र पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.