नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पाण्याने तुडुंब भरली आहेत आणि आता जायकवाडीही पूर्ण भरल्याने पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे, दोन वेळ पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. बुधवारी (दि.२७) शिवसेनेच्या नगरसेवकांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन त्याबाबत निवेदन सादर केले. यावेळी, आयुक्तांनी पाणीपुरवठा वितरणाची माहिती मागवत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासित केले.महापालिकेतील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते व शिवसेना गटनेता विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सेनेच्या नगरसेवकांनी आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी सांगितले, शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे जवळपास शंभर टक्के भरलेली आहेत. त्यामुळे शहराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटलेली आहे. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाला शहरापेक्षा ज्या जायकवाडी धरणाला नाशिककरांचे हक्काचे पिण्याचे पाणी सोडण्याची घाई असते, ते धरणदेखील पूर्णपणे भरून विसर्ग केला जात आहे. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही शहरातील कित्येक भागात केवळ एक वेळ पाणीपुरवठा अत्यंत अपुºया दाबाने केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन गरजेइतकेही पाणी उपलब्ध होत नाही. त्यात पाणीपुरवठा वितरण यंत्रणेचा दोष प्रामुख्याने दिसून येत आहे. धरणे भरली असतानाही नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणी असूनही टंचाईची स्थिती असल्याने लोकप्रतिनिधींनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पाण्याची मुबलक उपलब्धता लक्षात घेता शहरातील सर्व भागात दोन वेळचा पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी बोरस्ते यांनी केली. यावेळी सेना नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील पाणीपुरवठ्यासंबंधीच्या अडचणी कथन केल्या. आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना पाचारण करत त्यांच्याकडून वितरण स्थितीचा अहवाल मागविला आहे.
धरणात मुबलक साठा; दोन वेळ करा पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 3:34 PM