श्याम बागुल नाशिकगत वर्षी जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेम पाण्याचा साठा असताना, पाण्याची सातत्याने होणारी मागणी व त्याचा पुरवठा करण्यात दमछाक झालेल्या जिल्हा प्रशासनाला यंदा धरणांची स्थिती पाहून काहीसे हायसे वाटू लागले असले तरी, मार्चच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचा जबरदस्त तडाखा बसू लागल्याने ज्याप्रमाणे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ होत आहे त्याचप्रमाणात धरणांच्या पाण्याचे बाष्पीभवनही झपाट्याने होऊन पातळी कमी होत चालली आहे. मुळात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे डिसेंबर, जानेवारीत पिकांसाठी किंबहुना रब्बीसाठी राखून ठेवलेले पाणी सोडण्याची वेळ तशी प्रशासनावर आली नाही, मात्र नजीकच्या काळात अशीच परिस्थिती असेल याविषयी कोणीच खात्री देऊ शकत नाही. जिल्ह्यातील बागलाण, नांदगाव, मालेगाव, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, सिन्नर या तालुक्यांना मार्चच्या पहिल्या आठवड्यात पाण्याची टंचाई भासू लागली असून, मालेगाव तालुक्यातील दुंधे येथे पहिला टॅँकर सुरू करण्यात आला, त्यापाठोपाठ बागलाण तालुक्यात तीन टॅँकर सुरू झाले आहेत. दुसरीकडे उन्हाळी पिकांसाठी धरणातून आवर्तन सोडावे यासाठी शेतकरी आग्रही झाले असून, गावोगावी बैठका, आंदोलनाची रूपरेषा ठरू लागली आहे. धरणांमध्ये पाण्याचा साठा असूनही सरकार मुद्दाम शेतीला व पिण्याला पाणी देत नसल्याची भावना वाढीस लागली असून, जिल्ह्यातील धरणांचे पाणी अन्य जिल्ह्यांकडे वळविले जात असल्याचा समज झपाट्याने पसरला आहे. अशा परिस्थितीत येणाऱ्या तीन महिन्यांच्या काळात धरणातील ४२ टक्के साठ्यावर तहान भागवावी लागणार आहे.
गंगापूरमधून आवर्तन सुरू
नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागाला व लगतच्या जिल्ह्यांची तृष्णा भागविणाऱ्या गंगापूर धरणात सध्या ३१०४ दशलक्ष घनफूट म्हणजेच धरण क्षमतेच्या ५५ टक्के इतके पाणी शिल्लक असले तरी, त्यात नाशिक महापालिकेचे आरक्षण आहे. या शिवाय सातपूर, अंबड औद्योगिक वसाहत, त्र्यंबक नगरपालिका, एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्पासाठीदेखील पाणी आरक्षित ठेवण्यात आलेले आहे. गंगापूर धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. सध्या गंगापूर धरणातून एकलहरा औष्णिक केंद्रासाठी पाणी सोडले जात आहे.४चालू महिन्यात ३१५ दशलक्ष घनफूट, एप्रिल ते मे महिन्यात २९० व मेअखेरीस २६० दशलक्ष घनफूट पाणी सोडले जाणार असल्याने गोदावरीत पाणी खळाळेल. या शिवाय हिवाळी व उन्हाळी पिकांसाठीही पाण्याचे आरक्षण असल्याने हिवाळी पिकांसाठी पाणी सोडण्याची फारशी वेळ आलेली नाही, मात्र उन्हाळी पिकांसाठी मागणी वाढू लागल्याने सिंचनासाठी पाणी सोडतानाच, डाव्या कालव्यावर येणाऱ्या कसबे सुकेणे पाणीपुरवठा योजना, पिंप्रीसय्यद योजना, मेरी पाणीपुरवठा योजनेसाठीही याचवेळी पाणी सोडले जाणार आहे. जेणे करून पाण्याची गळती रोखण्यास मदत होते. गंगापूर धरणाच्या दोन्ही कालव्यांच्या माध्यमातून नाशिक, निफाड तालुक्यांतील गावांना पिण्याचे व सिंचनाचे पाणी सोडले जाते. गंगापूर धरण समूहात कश्यपि व गोतमी गोदावरी या दोन धरणांचा समावेश होतो, परंतु या दोन्ही मध्यम धरणातील पाणी गंगापूर धरणातच सोडले जाते. त्यामुळे या दोन्ही धरणांच्या पाण्यावर कोणतेही आरक्षण नाही.