सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील मिरगाव येथे मासिक सभेत ग्रामविकास अधिकाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की करुन जीवे मारण्याचा दम देणाऱ्या तिघा संशयितांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामविकास अधिकारी विवेकानंद पवार यांनी याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
१२ ऑगस्ट रोजी मिरगाव येथे सरपंच मीराबाई शेळके यांच्या अध्यक्षतेखाली मासिक बैठक ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली होती. या बैठकीत ग्रामपंचायत शिपाई प्रकाश हिंगे याचा निलंबनाचा ठराव मंजूर करण्यात आला. तथापि, सुदाम किसन हिंगे यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यास तुला शिपायाला निलंबनाचा काय अधिकार असे म्हणत इतिवृत्तावर पेनने खाडाखोड केली. बाबासाहेब शेळके व संतोष हिंगे यांनी शिवीगाळ करीत धक्काबुक्की करुन मिरगावातून जिवंत जाऊ देणार नाही, असा दम देऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार ग्रामविकास अधिकारी पवार यांनी वावी पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी सुदाम किसन हिंगे, बाबासाहेब किसन शेळके व संतोष विठ्ठल हिंगे या संशयिताविरोधात पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे, जीवे मारण्याची धमकी देणे यासंबंधी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश गवळी, हवालदार नितीन जगताप अधिक तपास करीत आहेत.
चौकट...
संशयितात सरपंचाचे पती, उपसरपंच, शिपायाचा भाऊ
ग्रामविकास अधिकाऱ्यास धमकी देणे, सरकारी कामात अडथळा आणणे असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या संशयितात महिला सरपंचाचे पती, उपसरपंच व शिपायाचा भाऊ यांचा समावेश असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी दिली. १२ ऑगस्ट रोजी मासिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर ग्रामविकास अधिकारी पवार यांनी ३ सप्टेंबर रोजी वावी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली.