नाशिक : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी व विद्यार्थिनींवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि.६) राष्ट्रवादी भवन व कॅनडा कॉर्नर येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयासमोर निदर्शने करून घोषणाबाजी केली. यावेळी अभाविप व राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणले. त्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी विद्यार्थी वसतिगृहातील शुल्कवाढीच्या विरोधात जेएनयू स्टुडंट युनियनच्या आंदोलनादरम्यान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी बुरखा घालून आंदोलनकर्त्यांवर व शिक्षकांवर तुफान दगडफेक करीत जेएनयू स्टुडंट युनियनचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक जखमी केल्याचा आरोप करीत या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सोमवारी कॅनडा कॉर्नर येथील अभाविप कार्यालयाच्या आवारात घोषणाबाजी केली. त्यामुळे अभाविपचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याने दोन्ही पक्ष आमने-सामने येऊन काही कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी होऊन या ठिकाणी तणाव निर्माण झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दंगलनियंत्रण पथकाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी घोषणाबाजी करणारे राष्ट्रवादीचे पुरुषोत्तम कडलग, प्रेरणा बलकवडे व अभाविपचे प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे यांच्यासह दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली. त्यानंतर या भागात दंगल नियंत्रण पथकासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.