नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने कोविड १९च्या गंभीर परिस्थितीत आरोग्य शाखेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेताना कोविड सुरक्षा कवच योजना सुरू केली. संकटाच्या कोविड १९ परिस्थितीत परीक्षा घेऊन विक्रमी वेळेत निकालही जाहीर केले. आरोग्य विज्ञानाच्या सर्वच शाखांमध्ये कोविड १९ वर दर्जेदार संशोधन व्हावे, यासाठी विद्यापीठातर्फे विशेष संशोधन अनुदान उपलब्ध करण्यात आले.
मुक्त विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा यशस्वी
नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ५ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विविध शिक्षणक्रमांच्या ऑनलाइन परीक्षांचे यशस्वी आयोजन केले. या परीक्षेत विद्यापीठातील ८० टक्के विद्यार्थ्यांनी पहिल्याच टप्प्यात परीक्षा दिली. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने ४ ते ९ नोव्हेंबरदरम्यान दुसऱ्यांना संधी उपलब्ध करून दिली.
विद्यार्थ्यांचा डिजिटल युगात प्रवेश
नाशिक : या वर्षी १५ जूनला शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. मात्र, शाळा उघडल्या नाहीत. नाशिकमधील शासकीय शाळांसोबतच खासगी शाळा व शिक्षण संस्थाचालकांनी ऑनलाइन शिक्षणपद्धती आत्मसात करीत ७० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण प्रवाहात सामावून घेतले, तर आदिवासी पाड्यावरील काही शाळांमध्ये शिक्षकांनी थेट विद्यार्थ्यांना घरापर्यंत जाऊ ज्ञानगंगा प्रवाहित ठेवली.
तीन शिक्षकांचा आंतरराष्ट्रीय गौरव
युनोस्कोतर्फे ५ ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने युनोस्कोशी सलग्न ‘इको ट्रेनिंग सेंटर स्विडन’ संस्थेतर्फे नाशिकमधील तीन शिक्षकांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. यात डायटचे अधिव्याख्याता योगेश सोनवणे, प्रशिक्षण समन्वयक प्रदीप देवरे व भारती पाटील यांचा ‘आंतरराष्ट्रीय शिक्षक’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
शाळेची घंटा वाजलीच नाही
कोरोनामुळे नाशिक जिल्ह्यात डिसेंबर २०२० अखेपपर्यंत शाळेची घंटा वाजलीच नाही. देशात मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव करताच, टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील शाळांनाही सुट्टी देण्यात आली. त्यानंतर पुन्हा डिसेंबर उलटला, तरी शाळा सुरू झाल्याच नाही.
कोरोनाच्या संकटातही निकाल
नाशिक विभागीय शिक्षण मंडळाने कोरोनाच्या संकटातच दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर कले. त्यासाठी जिल्हाभरातील शिक्षकांनीही विभागीय मंडळाला सहकार्य केले. नाशिकसह, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील उत्तरपत्रिका संकलन, तपासणी व निकालपत्र तयार करण्यात विभागातील तपासणी शिक्षक, केंद्र संचालकांसह अधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.
मुक्त विद्यापीठातील कृषी अभ्यासक्रम बंद
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी पदवी अभ्यासक्रम बंद करण्याच्या सूचना यूजीसीकडून करण्यात आल्या. त्यामुळे विद्यापीठाला हा अभ्यासक्रम बंद करावा लागला. हा अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यासाठी कुलगुरू ई वायुनंदन यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही ठिकाणी पाठपुरावा सुरू केला असून, या निर्णयाविरुद्ध कायदेशीर लढाईचीही विद्यापीठाने तयारी ठेवली आहे.