नाशिक जिल्ह्यात मागील वर्षापासून कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. पहिली लाट काहीशी सौम्य असली तरी दुसऱ्या लाटेने मात्र कहर केला अनेकांना कारोनाचा संसर्ग झाला. अनेक घरातील संपूर्ण कुटुंब बाधीत झाले होते. त्यातून बहुतेकजण सावरले असले तरी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. काही घरांमध्ये तर घरातील कर्ती माणसेच निघून गेल्याने मुले पोरकी झाली. त्यांच्या शिक्षणासह भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला अशा विद्यार्थ्यांना नवचेतना संस्थेने आधार दिला असून कोरोनामुळे आई, वडिलांचा मृत्यू झालेल्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी या संस्थेने घेतली आहे. यासाठी जिल्हाभरातून संस्थेने अर्ज मागविले होते. आतापर्यंत संस्थेकडे जिल्ह्याभरातून ४६ विद्यार्थ्यांनी संस्थेकडे अर्ज पाठविले आहेत. त्यात नाशिक शहरातील आणि काही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचे अर्ज आहेत. या विद्यार्थ्यांची शाळा, महाविद्यालयाची संपूर्ण फी भरण्याबरोबरच त्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य संस्थेतर्फे दिले जाणार असल्याची माहिती संस्थेचे प्रशांत पाटील यांनी दिली. कोरोनामुळे आई, वडील दगावलेल्या मुलांचे शिक्षण थांबू नये त्यांना पोरकेपणाची जाणीव होऊ नये या उद्देशानेच नाशिक येथील हेमंत राठी, मधुकर ब्राम्हणकर, प्रशांत पाटील, राजेश कोठावदे या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी एकत्र येऊन नवचेतना या संस्थेची स्थापना केली आहे. पुढील किमान १५ वर्षे तरी हा उपक्रम सुरू ठेवू, असा विश्वास संस्थेच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. या कार्याला समाजातील दानशूरांचाही हातभार लागेल, असा विश्वासही व्यक्त केला जात असून संस्थेच्या या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलास मिळाला आहे.
नवचेतनाने स्वीकारले ४६ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:12 AM