सिन्नर: तालुक्यात माळेगाव व मुसळगाव या दोन महत्त्वाच्या औद्योगिक वसाहतींमधील (एम.आय.डी.सी.) कामगारांना उच्च दर्जाचे आणि मोफत उपचार मिळावेत, यासाठी गेल्या चार महिन्यांपूर्वी केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने तीस खाटांच्या स्वतंत्र रुग्णालय उभारणीला मंजुरी दिली आहे. माळेगाव, मुसळगाव येथील औद्योगिक वसाहतींमधील कामगारांच्या आरोग्य स्वास्थ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयात कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांवर मोफत उपचार करण्यात येणार असून सदर रुग्णालय उभारणीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
गुरुवारी खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत ई.एस.आय.सी.च्या विशेष पथकाने माळेगाव-मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील प्रस्तावित जागेची पाहणी करण्यात आल्याने रुग्णालय उभारणीसाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सदर प्रस्तावित रुग्णालयाची क्षमता ३० खाटांऐवजी १०० खाटांची व्हावी, अशी मागणी गोडसे यांनी पथकाच्या प्रमुखांकडे केली आहे.
सिन्नर तालुक्यातील मुसळगाव, माळेगाव या दोन मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. येथील कारखान्यांमध्ये सुमारे ५० हजार कामगार सतत कार्यरत असतात. सिन्नर, मुसळगाव, माळेगाव, वावी याठिकाणी वर्षानुवर्षे कामगार आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. मात्र येथील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचारासाठी केंद्र शासनाकडून कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे कामगारांमध्ये नाराजीचा सूर होता.
सदर प्रस्तावित रुग्णालयासाठी जागा मिळविण्यासाठी गोडसे यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकारी मांढरे यांनी प्रस्तावित रुग्णालयासाठी सिन्नर तालुक्यातील मोह आणि मुसळगाव याठिकाणी शासकीय भूखंड असल्याचे स्पष्ट केले होते. सदर प्रस्तावित रुग्णालय उभारणीच्या कामासाठी हालचाली सुरु झाल्या. यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे युवानेते उदय सांगळे, तहसीलदार राहुल कोताडे, श्रम मंत्रालयाचे निश्चलकुमार नाथ, एस. के. पांडे, जितेंद्र खैरनार आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या रुग्णालयाचा फायदा औद्योगिक वसाहतींमधील हजारो कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना होणार आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना उच्च दर्जाचे उपचार जलद व मोफत मिळणार आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
---------------------
सिन्नर तालुक्यात माळेगाव-मुसळगाव औद्योगिक वसाहतीत ई.एस.आय.सी.च्या विशेष पथकाने कामगारांसाठी होणाऱ्या प्रस्तावित रुग्णालयाच्या जागेची पाहणी केली. त्याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, राहुल कोताडे यांच्यासह पथकातील अधिकारी. (२० सिन्नर ५)
===Photopath===
200521\20nsk_10_20052021_13.jpg
===Caption===
२० सिन्नर ५