मालेगाव तालुक्यातील पाटणे परिसरात खरीप पेरणीचा हंगाम जवळ येत असल्याने त्यासाठी आवश्यक पेरणीपूर्व मशागतीच्या कामात शेतकरी मग्न झाला आहे. सर्वत्र कामाची लगबग बघावयास मिळत आहे .खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे बऱ्याचअंशी ट्रॅक्टरने केली जात आहेत. उर्वरित शेतकरी बैलजोडीद्वारे मशागत करत आहेत. डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे ट्रॅक्टर व बैलजोडीद्वारे मशागतीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
खरीप हंगामातील पिकांच्या निकोप आणि उत्तम वाढीसाठी जमिनीची पेरणीपूर्व मशागत होणे अत्यंत गरजेचे असते. जमीन भुसभुशीत व तणविरहीत केल्यास जमीन पेरणीयोग्य होते. बळीराजाला उत्पादन चांगले मिळू शकते. मशागतीमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरून ओलावा टिकून राहतो. तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. जमिनीत हवा खेळती राहून ती पिकांना पोषक ठरते. त्यामुळे पिकांची उगवण क्षमता व वाढ जोमाने होऊन उत्पन्नात वाढ होते .खरीप हंगामावर शेतकऱ्यांची आशा जास्त असते. कारण विहिरींना पाणी असेल तरच रब्बीची पिके घेता येतात. त्यामुळे सर्वच शेतकरी फक्त खरिपाच्या पिकावर अपेक्षा ठेवून असतात. यावर्षीही पाऊस चांगला राहील, असा अंदाज असल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, बळीराजा उत्साहाने मशागतीत मग्न झाला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून मुबलक प्रमाणात पाऊस पडत असल्याने खरिपाची पिके जोमदार असतात. परंतु काढणीयोग्य झाल्यानंतर अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याने बळीराजा हवालदिल झालेला आहे . बळीराजा खरिपाच्या पिकासाठी पेरणीपूर्व मशागत, पेरणी, बियाणे, खते यासाठी लागणारा पैसा कसा उभा करावा, या समस्येने धास्तावला आहे. कारण नुकतीच मशागतीची वाढलेली मजुरी तसेच रासायनिक खताच्या भरमसाठ वाढलेल्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्याने शेती कशी करावी, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन रासायनिक खतांच्या वाढीव किमती कमी करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे . पाटणे परिसरात उन्हाचा तडाखा, कोरोनाचे सावट, आर्थिक अडचण अशा सर्व समस्या असतानाही बळीराजा खरिपाच्या लागवडीपूर्व मशागतीत व्यस्त आहे.
कोट...
कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे शेतमालाला भाव नाही. मार्केट बंद आहेत. अशातच डिझेलचे भाव वाढल्याने मशागतीचा खर्च वाढला आहे. नुकतेच खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी कशी करावी. बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने तातडीने दखल घेऊन रासायनिक खताचे भाव कमी करावेत. शेतकऱ्यांना बांधावरच खत आणि बियाणे मिळवून देण्याची व्यवस्था करावी.
- वसंत अहिरे, संचालक, वि. का. सोसायटी, पाटणे