नाशिक : इगतपुरी ते ठाणेदरम्यान सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाचा टप्पा क्रमांक १४च्या कामाने आता गती घेतली आहे. मध्यंतरी कोराेनामुळे मजूर आपापल्या गावी परतल्याने या कामावरही परिणाम झाला होता. आता मजूर परतल्याने तसेच वाहतूकही सुरळीत झाल्याने या कामाला गती आली असल्याने निर्धारित वेळेपेक्षा महामार्गाचे काम पूर्णत्वास येण्याची अपेक्षा येथील अभियंत्यांनी वर्तविली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रकल्पाचे सुमारे ४२ टक्के काम पूर्ण झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे.
नागपूर ते शिर्डीपर्यंतचा मार्ग पुढील सहा महिन्यांत पूर्ण होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे नाशिकचे कामकाज कधी पूर्ण होणार, याकडेदेखील सर्वांचे लक्ष असणार आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. नागपूर ते मुंबई असा हा मार्ग असून, राज्यातील दहा मुख्य जिल्हे आणि इतर १४ जिल्ह्यांमधून हा सुपरफास्ट महामार्ग जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, इगतपुरीतूनदेखील हा मार्ग जाणार आहे. २०१९ मध्ये नाशिकमधील समृद्धी महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली असून, सप्टेंबर २०२२ मध्ये प्रकल्प पूर्ण करण्याचा अवधी आहे.
इगतपुरी ते ठाणेदरम्यान या मार्गावर आठ किलाेमीटरचा बोगदा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गावरील हा सर्वात मोठ्या लांबीचा बोगदा असल्याने जाण्या-येणाऱ्या वाहनांसाठी दोन बोगदे आहेत. डाव्या बाजूचा बोगदा हा ७.७८ मीटर लांबीचा, तर उजव्या बाजूचा बोगदा हा ७.७४ मीटर लांबीचा आहे. या बोगद्यामुळे कसारा घाट हा अवघ्या सात मिनिटांत पार करता येणार आहे. शिवाय मुंबईला जाण्याचे अंतरदेखील कमी होणार आहे.
इगतपुरी तालुक्यातून ४० किलोमीटर लांबीचा टप्पा जाणार आहे, तर दोन डोंगरांना जोडणारा पूल हेदेखील समृद्धी कामाचे वैशिष्ट्य आहे.
समृद्धी कामकाजाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी सुरू केल्याने पुढील सहा महिन्यांत पहिल्या टप्प्यातील वाहतूक सुरू होण्याची अपेक्षा आहे. सर्वात मोठ्या लांबीचा बोगदा नाशिक जिल्ह्यातून जात असल्याने या बोगद्याची पाहणीदेखील मुख्यमंत्री येत्या काही महिन्यांत करण्याची शक्यता आहे. या कामाला गती देण्याच्या दृष्टीने त्यांची भेटदेखील महत्त्वाची ठरू शकणारी आहे.
(फोटो: डेस्कॅनला)