नाशिक : तक्रारदाराला सांभाळण्याच्या बदल्यात २८५० रुपयांची लाच स्वीकारताना त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकराज अनाथ बालकाश्रमाच्या सचिव आशादेवी फकिरराव अहिरराव यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.त्र्यंबकेश्वर येथे शासन मान्यताप्राप्त त्र्यंबकराज अनाथ बालकाश्रम आहे. तक्रारदाराचा नातू सदर आश्रमात राहत असून, या मुलाच्या पालनपोषणासाठी आश्रमाच्या सचिव आशादेवी फकिरराव अहिरराव व परमदेव फकिरराव अहिरराव यांनी प्रतिमहिना ७०० रुपयेप्रमाणे जुलै २०१८ ते मार्च २०१९ पर्यंतच्या ५९५० रुपयांपैकी ३१०० रुपये यापूर्वीच घेतले असून, उर्वरित २८५० रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करून सापळा लावला असता त्र्यंबकराज अनाथ बालकाश्रमात आशादेवी अहिरराव यांना २८५० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.