नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिक पश्चिम वनविभागाच्यावतीने त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अंजनेरी गडावर भाविकांना अथवा पर्यटकांना प्रवेश बंद केला आहे. शासनाच्या आदेशानुसार हनुमान जन्मोत्सवदेखील सार्वजनिक स्वरूपात गडाच्या पायथ्याशी होणार नसल्याने भाविक पर्यटकांनी याठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून मान्यता असलेल्या अंजनेरी गडावर दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त यात्रा भरते; मात्र, यावर्षी कोरोनाच्या साथीने सर्व राज्यभरात आणि जिल्ह्यात थैमान घातल्याने सर्व धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय सोहळे, सण, उत्सव रद्द करण्याचे तसेच धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. हे आदेश जिल्ह्यातसुद्धा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जसेच्या तसे लागू केले आहेत. त्यामुळे यंदा हनुमान जयंतीनिमित्ताने अंजनेरी गडावर यात्रा भरणार नाही, असे अंजनेरी ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी सांगितले आहे. तसेच अंजनेरी गडाच्या वाटादेखील वनविभागाकडून बंद करण्यात आल्या आहेत. शासकीय आदेशाचे पालन करीत अंजनेरी गडावर कुठल्याहीप्रकारे गर्दी होणार नाही याची सर्वतोपरी खबरदारी वनविभागाकडून घेतली जात असून त्र्यंबकेश्वर पोलिसांनाही याबाबत कळविण्यात आले आहे. अंजनेरीगडाच्या पायथ्याला तसेच गडमाथ्यावर वनविभागाचा तसेच त्र्यंबक पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. त्यामुळे भाविकांनी अंजनेरी गडावर येऊ नये, प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नाशिक, त्र्यंबकेश्वरचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, सरपंच पुष्पा बदादे, उपसरपंच गणेश चव्हाण यांनी केले आहे. -
(फोटो nsk वर पाठवीत आहोत)
--इन्फो---
गड, किल्ले, वनक्षेत्रात प्रवेश निषिद्ध
नाशिक, त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रातील सर्व राखीव वनक्षेत्र, पाहिने-पेगलवाडी वनक्षेत्र, ब्रह्मगिरी पर्वत, मेटघर किल्ला, दुगारवाडी वनक्षेत्र, हर्षेवाडीचे हरिहरगड आदी परिसरात नागरिकांना प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. हौशी पर्यटकांनी या भागात भटकंती करणे टाळावे, असे आवाहन वनविभाग व त्रंबकेश्वर पोलिसांनी केले आहे.