नाशिक : ज्या पक्षाला आतापर्यंत ४० पैकी २७ नगरसेवकांनी गुडबाय केले, येत्या निवडणुकीत ज्याचा काहीच प्रभाव राहणार नाही, असे विरोधक म्हणत आहेत, त्या मनसेचे ‘राजगड’ कार्यालय मंगळवारी पक्षप्रवेश सोहळ्यामुळे गजबजले होते. एकीकडे गळतीमुळे पक्षाचे भवितव्य धूसर बनले असताना बिथरलेल्या कार्यकर्त्यांसाठी पक्षप्रवेश सोहळा दिलासा देणारा ठरला. त्यामुळे दीर्घकालावधीनंतर पक्षकार्यालयाबाहेर ढोल-ताशांचा गजर ऐकायला मिळाला. महापालिकेत पाच वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या मनसेच्या सर्वाधिक २७ नगरसेवकांनी दुसऱ्या पक्षाशी घरोबा केला आहे. मनसेने सत्ताकाळात काहीच नवनिर्माण केले नसल्याची टीका सेना-भाजपासह अन्य विरोधी पक्षांनी सातत्याने केली. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत सत्तांतर होणार असल्याचे दावे विरोधकांकडून केले जात आहेत. माजी आमदारापासून ते जिल्हाध्यक्षांपर्यंत अनेकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे मनसेची एकूणच झालेली वाताहत कार्यकर्त्यांना अस्वस्थ करून सोडणारी ठरली. पक्ष सोडून जाणाऱ्यांचीच गेले काही दिवस चर्चा होत राहिली मात्र पक्षात कुणी प्रवेश केल्याची खबर येत नव्हती. खिळखिळ्या झालेल्या पक्षाच्या एकूणच भवितव्याबद्दलही चर्चा होत राहिली. येत्या निवडणुकीत पक्षाला उमेदवारही मिळणार नाहीत, असा दावा विरोधक करत आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी ‘राजगड’ कार्यालयात काही कार्यकर्त्यांचा झालेला पक्षप्रवेश सोहळा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरणारा ठरला. (प्रतिनिधी)
गळती लागलेल्या मनसेत प्रवेश सोहळा
By admin | Published: January 18, 2017 12:14 AM