घोटी - इगतपुरी तालुक्यातील बिटुर्ली येथील युवक देवदर्शनासाठी घोटी - सिन्नर महामार्गावर धामणगाव शिवारात शनिवारी (दि.१३) दुपारी ४ वाजता जेजुरीकडे दर्शनासाठी जात होते. सिन्नरवरून मिरचीने भरलेला टेम्पो घोटीकडे भरधाव वेगाने येत असताना बोलेरो गाडीला धडक मारल्याने भीषण अपघात होऊन त्यात २ जण ठार तर तिघे जखमी झाले आहेत. देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने बिटूर्ली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
इगतपुरी तालुक्यातील घोटी जवळील बिटूर्ली येथील काही भाविक जेजुरी येथे देवदर्शनासाठी बोलेरोने (क्रमांक एम एच ०४ डी वाय ०८७५) जात होते. सिन्नरवरून घोटीच्या दिशेने मिरची भरून येणारा टेम्पो (क्रमांक एम एच २१ बीएच ३६६४) भरधाव वेगाने येत होता. धामणगाव शिवारात टेम्पो बोलेरो गाडीवर येऊन आदळला. या अपघातात बोलेरोचा चक्काचूर झाला असून, टेम्पोचेसुद्धा नुकसान झाले आहे. टेम्पोची धडक एवढी भयंकर होती की बोलेरोने काही पलट्या खाऊन तिचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. अपघातात अक्षय गोपाल पारधी (२०) व रवींद्र पांडुरंग खडके राहणार बिटूर्ली (१९) जागेवरच ठार झाले, तर समवेत असलेले अक्षय रामनाथ उघडे (२०), भरत बबन इरते (१९) व सचिन सावजी शिद (२०) सर्व रा. बिटूर्ली हे तिघे जखमी झाले आहेत.
गावावर शोककळाअपघात होताच क्षणी सामाजिक कार्यकर्ते खंडूसिंग परदेशी यांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलविले. या अपघातामुळे ग्रामीण भागातील छोट्याशा बिटूर्ली गावावर शोककळा पसरली आहे. टेम्पोधारक चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, हवालदार शीतल गायकवाड, सुहास गोसावी आदी करीत आहेत.