नाशिक : अपघातात जखमी झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला मदतीसाठी धावलेल्या बघ्यांच्या गर्दीचा फायदा घेत एका भामट्याने गर्दीत घुसून मदत करण्याचा बहाणा करत जखमीच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या अलगद काढून पोबारा केल्याची घटना चार दिवसांपुर्वी पंचवटी कारंजा भागात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी संशयित भामट्यास अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गेल्या बुधवारी (दि.८) पादचारी सुभाष रामकृष्ण भुतडा (६५, रा.मालेगाव स्टॅन्ड) हे कारंजाच्या दिशेने जात असताना ढिकले वाचनालयाजवळ त्यांना पाठीमागून चुकीच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने संध्याकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास धडक दिली. या धडकेत भुतडा जखमी झाले, त्यांना मदतीसाठी धावलेल्या गर्दीत एक चोरटाही मदतनीसच्या भूमिकेत शिरला आणि त्याने चक्क जखमी भुतडा यांच्या बोटांमध्ये असलेल्या सोन्याच्या दोन अंगठ्या हातचलाखीने काढून घेत काढता पाय घेतला. भुतडा यांना औषधोपचारानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानुसार पोलिसांनी या गुन्ह्याची तपासचक्रे फिरविली. गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने संशयित दिलीप उर्फ लहान्या हिरामण वानखेडे (३६, रा.येवलेकर चाळ, पंचवटी कारंजा) यास ताब्यात घेतले. त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली देत २८ हजार ८९० रुपये किंमतीच्या ९ग्रॅम वजनाच्या अंगठ्या काढून दिल्या. पुढील कारवाईसाठी संशयित लहान्याला पंचवटी पोलिसांच्या हवाली करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे आनंदा वाघ यांनी दिली. या कारवाईत सहायक निरिक्षक एस.एम.खैरनार, सहायक उपनिरिक्षक पोपट कारवाळ, रविंद्र बागुल, प्रविण चव्हाण, विशाल देवरे यांनी सहभाग घेतला.
अपघातात जखमीच्या मदतीला आला अन् सोन्याच्या अंगठ्या घेऊन पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 8:05 PM
मदतीसाठी धावलेल्या गर्दीत एक चोरटाही मदतनीसच्या भूमिकेत शिरला आणि त्याने चक्क जखमी भुतडा यांच्या बोटांमध्ये असलेल्या सोन्याच्या दोन अंगठ्या हातचलाखीने काढून घेत काढता पाय घेतला. भुतडा यांना औषधोपचारानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
ठळक मुद्देचार दिवसांपुर्वी पंचवटी कारंजा भागात घडली घटना २८ हजार ८९० रुपये किंमतीच्या ९ग्रॅम वजनाच्या अंगठ्या काढून दिल्या