वडाळागाव : गेल्या मंगळवारी रात्रीपासून येथील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. येथे असलेल्या म्हसोबा महाराज मंदिराजवळील नाल्याला आलेल्या पुराचे पाणी ओसरले आहे; मात्र अद्याप स्वच्छता केली जात नसल्याने वाहने घसरून अपघातांमध्ये वाढ होत आहे.गेल्या मंगळवारी आणि गुरुवारी दिवसभर झालेल्या पावसाने वडाळा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील जेएमसीटी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या समोर सखल भागात तलाव निर्माण झाला आहे. वडाळागावाकडून शहरात जाणारा एकेरी रस्ता पाण्याखाली गेला होता. तसेच नाल्याचे पाणीही रस्त्यावरून वाहत होते. यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल साचला आहे. दुभाजकाला लागून चिखलाचा बांध तयार झाला आहे. वडाळा रस्त्यावर तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे. सखल भाग असलेल्या रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.वडाळा चौफुलीवरही खड्ड्यांचे साम्राज्य असून, रात्रीच्या वेळी येथील वाहतूकबेटामध्ये असलेले हायमास्टही बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे चौफुलीवर वाहने समोरासमोर येत असून, अपघातांना निमंत्रण देत आहे. त्याचप्रमाणे मुख्य रस्त्यावरील बहुसंख्य पथदीप पावसाच्या पाण्यामुळे नादुरुस्त झाले आहेत, तर काही पथदीपांच्या वायरी खालील बाजूने उघड्या पडल्याने धोका निर्माण झाला आहे. महारुद्र हनुमान मंदिरापासून पुढे गावामध्ये जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सखल भागामुळे या ठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचल्याने महावितरणचा खांब निम्मा बुडाला होता. पाणी ओसरल्यानंतर रस्त्यावर बारीक कच व माती पसरली असून खड्डे पडले आहेत. (वार्ताहर)
वडाळा रस्त्यावर चिखलामुळे अपघात
By admin | Published: August 08, 2016 12:24 AM