अझहर शेख ।नाशिक : आपल्यावर ओढावलेला अपघाताचा प्रसंग इतरांवर येऊ नये आणि आपल्यासारखे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, या अस्वस्थ करणाºया विचाराने तिशीतला संजयकुमार हा युवक गेल्या दहा वर्षांपासून रस्ता सुरक्षा जनजागृतीचे व्रत घेत अवघा महाराष्टÑ पिंजत आहे. कारण एका अपघातात तो मृत्यूच्या दाढेत ओढावला गेला होता. ही वेळ इतरांवर येऊ नये, यासाठी त्याची धडपड सुरू आहे. नागपूर येथील संजयकुमार भय्याराम गुप्ता बी.फार्मसीचे शिक्षण पूर्ण करून औषधाच्या एका कंपनीत वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून नोकरी करत होता. घरात आई, दोन बहिणी असे त्याचे कुटुंब. सर्व काही सुरळीत सुरू होते. वयाची तिशी गाठत असलेला हा तरुण विवाहाची स्वप्ने रंगवत संसार थाटण्याच्या तयारीत होता; मात्र नियतीने त्याच्याबाबत काही वेगळेच मांडून ठेवले होते. दिनचर्येनुसार तो दुचाकी घेऊन विनाहेल्मेट निघाला. अनवधानाने दुचाकीचे साइड स्टॅँड खुले राहिले अन् हे अपघाताचे मुख्य कारण ठरले. डोक्याला जबर मार लागला अन् रक्तस्त्रावही झाला. तासभर पडून असताना कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. त्यानंतर काही संवेदनशील नागरिकांनी त्यांना रुग्णालयात पोहचविले. डोक्याला जबर मार लागून रक्तस्त्राव झाल्याने जीवनाची आशा धुसर झाली होती. गुप्ता ‘कोमा’त गेले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली; मात्र धोका टळण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागला. धोका टळला खरा; मात्र त्यांना पक्षाघाताचा आघात झाला. यामुळे त्यांना अपंगत्व आले. संपूर्ण शरीर अपंग होऊन वाचा शुद्धीही हरपली. केवळ हृदयाचे ठोके सुरू होते. आईने मोठ्या मेहनतीने सुशुश्रा व उपचार करून त्यांना दोन वर्षानंतर स्वत:च्या पायावर उभे केले. आजही त्यांचा आवाजाचा स्वर कमी येतो तसेच एकसारखे काही मिनिटे जरी बोलले तरी घशात वेदना होतात. चालताना पायही लटपटतात तरीदेखील गुप्ता यांनी जिद्दीने समाजामध्ये असलेले वाहतूक नियमाविषयीची उदासिनता दूर करण्याचे व्रत घेतले आहे.देश अपघातमुक्त व्हावा हेच स्वप्नगुप्ता दीड वर्षे अंथरुणाला खिळून राहिले. आईने सुश्रुषा केली. जगण्याची आशा दाखवून आत्मविश्वास उंचावला. यामुळे गुप्ता आपल्या पायावर पुन्हा उठून उभे राहिले; मात्र आयुष्याच्या एक तप विसरून...जणू त्यांचा एक नवा जन्मच झाला... आई व बहिणींनी पुन्हा ‘बाराखडी’ शिकविली. बोलण्यापासून ते खाण्यापर्यंत सर्व काही धडे दिले. कोमामधून बाहेर पडल्यानंतर त्यांना अस्वस्थ करणाºया विचाराने समाजप्रबोधनाची दृष्टी दिली. या दृष्टीतून त्यांनी अपघातमुक्त देशाचे स्वप्न बघितले अन् रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम साक्षरता मिशन हाती घेतले. रस्ता सुरक्षेविषयी समाजप्रबोधन ते स्वखर्चाने करीत आहे.
अपघाताने स्मृती गेली, प्रबोधनाची दृष्टी दिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:16 AM