नाशिक : इगतपुरीला फिरण्यासाठी गेलेले एकाच कुटुंबातील चौघे जण नाशिकला परतत येत असताना दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात दुचाकीचालक युवतीचा जागीच मृत्यू, तर तेरा वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़२२) सायंकाळी माणिकखांबजवळ घडली़ ऋतुजा दीपक अरसुळे (२१, रा़ चर्मकार लेन, आझार चौक) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. या अपघाताची घोटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुने नाशिकमधील आझाद चौकातील रहिवासी दीपक वसंत अरसुळे हे रविवारी सकाळी पत्नी, मुलगी ऋतुजा व मुलगा जीवन यांच्यासह इगतपुरी परिसरात फिरण्यासाठी गेले होते़ दीपक हे पत्नीसह स्प्लेंडर दुचाकीवर तर मुलगी ऋतुजा व जीवन हे दोघे अॅक्टिवा दुचाकीवर होते़ सायंकाळी नाशिकला परतत असताना मुंबई महामार्गावर घोटीच्यापुढे माणिकखांब गावापासून काही अंतरावरील वळणावर ऋतुजा हिचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी स्लीप झाली़ यामध्ये तिच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर तिच्या पाठिमागे बसलेला भाऊ जीवन याच्या हाताला फॅक्चर झाले़
या अपघातानंतर दीपक अरसुळे यांनी तत्काळ ऋतुजाला रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषीत केले तर जखमी जीवनवर उपचार सुरू आहेत़ या घटनेनंतर अरसळे दाम्पत्याने रुग्णालयातच टाहो फोडला होता़ सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे दीपक अरसुळे यांची मुलगी ऋतुजा ही उच्च शिक्षण घेत होते़ या अपघाताची घोटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, या घटनेमुळे जुने नाशिक परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे़