येवला : तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथील रहिवासी व भारतीय सैन्यदलातील जवान नारायण निवृत्ती मढवई (३९) यांचा हिस्सार (हरियाणा) येथे गुरुवारी (दि. १०) रात्री अपघाती मृत्यू झाला आहे. मढवई यांच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली असून, पालकमंत्र्यांनीही कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. दरम्यान, शनिवारी मढवई यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
चिचोंडी बुद्रुक हे सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. गावातील सर्वात पहिले भारतीय सैन्य दलातील जवान म्हणून नारायण मढवई यांचे नाव आदराने घेतले जाते. गुरुवारी (दि. १०) रोजी रात्री कर्तव्य बजावून मढवई आपल्या निवासाकडे दुचाकीवरून निघाले असता दुचाकीस रणगाड्याची धडक बसली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. त्यांच्या पश्चात शेतकरी वडील निवृत्ती, आई ताराबाई, पत्नी सोनाली, मुलगा कृष्णा, हरीश, भाऊ बाळासाहेब, भाऊसाहेब असा मोठा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई यांचे ते पुतणे होत. दरम्यान, जवान मढवई यांचे पार्थिव शनिवारी, (दि. १२) सकाळी तालुक्यात येणार असून, शासकीय इतमामात त्यांच्या निवासस्थानी शेतातच अंत्यविधी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. तर तहसीलदार प्रमोद हिले यांनी मेजर नारायण मढवई यांच्या मृत्यूबाबत सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून खुलासा केला जाईल, असे म्हटले आहे.
इन्फो
गावातील पहिलेच सैनिक
२९ जानेवारी २००३ मध्ये सैन्यात भरती झालेले नारायण मढवई हे गावातील पहिले सैनिक होते. ते आरमाड विभागात रणगाडा चालक म्हणून कर्तव्यावर होते. एरंडगाव येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. त्यांचा सेवेचा कालावधी संपला होता; परंतु काही दिवसांपूर्वीच त्यांनी तीन वर्षे सेवा वाढविली होती. एरंडगाव येथील मच्छिंद्र बावके यांच्या सोनाली या मुलीशी त्यांचा २००८ मध्ये विवाह झाला होता.
कोट...
शेतकरी कुटुंबातून पुढे येत सैन्यदलात भरती झालेले नारायण मढवई यांनी सैन्यदलात अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाने भारतमातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. त्यांच्या निधनाने मढवई कुटुंबासोबतच संपूर्ण तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मी व माझे कुटुंबीय शहीद जवान मेजर नारायण मढवई यांच्या दुःखात सहभागी आहे.
- छगन भुजबळ, पालकमंत्री