त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तोरंगण परिसरातील हट्टीपाडा, हाळविहीर पाडा, तुंगार पाडा तसेच ठाणापाडा परिसरात चिकुनगुन्याच्या साथीने कहर केला आहे. ताप, सर्दी, डोकेदुखी, हात-पाय सुजणे, सांधे दुखणे या दुखण्यांचे प्रमाण वाढले आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाळ्यास सुरुवात झाली आहे. नद्या, नाले, विहिरी, झरे यांना नवीन पाणी आले की, नागरिकांचे जेथे पाणवठे आहेत, तेथील अगोदर साचलेल्या पाण्यात नवीन पाणी आपोआप मिसळते. साहजिकच लोक तेच पाणी पितात. त्यामुळे साथीचे आजार उद्भवत आहेत. याशिवाय उलट्या, जुलाब, अतिसार डायरियासारखे आजारही वाढू लागले आहेत. आता चिकुनगुन्या, डेंगीसदृश आजाराची साथ पसरत आहे. या आजाराने सांधेदुखीचा त्रास बरेच दिवस असतो. किमान ३०० ते ४०० रुग्णांना या आजाराने ग्रासले आहे.
याबाबत ग्रामसेवक म्हणाले, सध्या परिसरात धुराची धुरळणी, औषध फवारणी सुरू केली आहे. लोकांच्या तक्रारीनुसार तोरंगण ह. येथे आरोग्य कर्मचारी, इमारत असूनही कमी असल्याने साथ वाढते की काय, याबाबत घबराट पसरली आहे.