नाशिक :महामार्गांवर ट्रकचालकांना अडवून लुटणा-या टोळीतील एका साथीदाराच्या ग्रामिण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या. त्याची कसून चौकशी केली असता तीन गुन्हे उघडकीस आले आहे. त्याचे इतर चार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.गुजरातकडे जाणाºया नाशिक-पेठ महामार्गावर एका ट्रकचालकाचे वाहन (के.अे५६-१९४५) गेल्या सोमवारी (दि.२०) बळजबरीने थांबवून ट्रकचालक अनिलकुमार बॅनर्जी (रा. जि. बिदर, कर्नाटक) यांना मारहाण करून टोळीने लेलॅन्डचा ट्रकसह कॉटनचा माल लुटला होता. या गुन्ह्यात तब्बल २६ लाख रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची फिर्यादी दिंडोरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या गंभीर गुन्ह्याची पोलीस अधिक्षक डॉ.आरती सिंह यांनी गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपास करून छडा लावण्याचे आदेश दिले. गुन्ह्याचे कुठलेही धागेदोरे हाती नसताना केवळ सीसीटीव्ही फुटेजच्या अधारे पोलीस निरिक्षक के.के.पाटील यांनी पोलीस निरिक्षक अनिल बोरसे, सहायक निरिक्षक संदीप दुनगहु, स्वप्नील राजपूत, उपनिरिक्षक कल्पेशकुमार चव्हाण, रामभाऊ मुंढे, दिपक अहिरे, अमोल घुगे, दत्तात्रय साबळे आदिंच्या पथकांनी तपासाला गती दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्याअधारे मालेगावमधील देवीचा मळा भागात सापळा रचला. यावेळी संशयित अजहर वाजीद खान (३०,रा.देवीचा मळा) यास शिताफीने बेड्या ठोकल्या. त्याची कसून चौकशी केली असून या टोळीने गुन्ह्यात वापरलेली कार (एम.एच०३ बीई ०३८२) हस्तगत केली. तसेच गुन्ह्यात गायब केलेली ट्रक झोडगे शिवारातून जप्त केली. तसेच १५ लाख रूपये किंमतीचे ४०९ कॉटनचे बंडल असा एकूण २३ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. खान याचे फरार साथीदार यांचा पोलीस शोध घेत असून लवकरच त्यांनाही अटक करण्यास यश येईल, असे पाटील यांनी सांगितले. या टोळीकडून महामार्ग लुटीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
२३ लाखांचा मुद्देमाल जप्त : ट्रक चालकांना लुटणाऱ्या टोळीचा साथीदार गळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 8:42 PM
ग्रामिण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने मालेगावातून मुसक्या बांधल्या
ठळक मुद्दे१५ लाख रूपये किंमतीचे ४०९ कॉटनचे बंडल हस्तगत