नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागात फाईली पेंडेन्सीचे वाढलेले प्रमाण आणि या विभागाविषयी तक्रारी वाढत नसल्याने आयुक्तांच्या आदेशानुसार बुधवारी (दि.१३) अचानक तीन अधिकाऱ्यांनी या विभागात झाडाझडती केली. सुमारे अठराशे फाईली प्रलंबित असल्याचे आढळले आहे. महापालिकेच्या नगररचना विभागासंदर्भात ई-कनेक्टवरील तक्रारींचे निराकरण होत नसल्याची तक्रार होती. याशिवाय मध्यंतरी याच विभागाचे सहायक अभियंता रवि पाटील हे कामाच्या ताणामुळे घर सोडून गेले होते. त्या पार्श्वभूमीवर हा विभाग चर्चेत आला होताच; परंतु काही फाईली सहेतूक अडविल्या जात असल्याच्यादेखील चर्चा होत्या. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लेखापरीक्षक महेश बच्छाव, लेखापाल सुहास शिंदे आणि शहर अभियंता घुगे यांना या विभागात अचानक भेट देऊन दप्तर तपासणीचे आदेश दिले होते, त्यानुसार दुपारी त्यांनी भेट देऊन सर्व फाईली तपासल्या तसेच त्यांची दाखल झाल्याची तारीख घेतानाच कोणत्या कारणामुळे प्रलंबित आहेत, या सर्व बाबींची माहिती घेतली. नगररचना विभागाचे सहायक संचालक आकाश बागुल यावेळी उपस्थित होते. झाडाझडतीतून प्राप्त माहितीच्या आधारे संबंधित अधिकारी अहवाल तयार करून आयुक्तांना सादर करणार आहेत.याप्रकारामुळे महापालिकेत खळबळ उडाली होती. दुपारनंतर अभ्यागत तसेच नगररचना विभागाशी संबंधित विकासक आणि वास्तुविशारद येत असतात. त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने या विभागाच्या बाहेर त्यांना ताटकळावे लागते.अभियंत्यांच्या बदल्या, मग काय होणार...महापालिकेच्या विविध विभागांतील बदल्या करताना नगररचना विभागात मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या असून, मोजक्या अभियंत्यांच्या खांद्यावर सर्व भार आला आहे. त्यामुळे कामे प्रलंबित राहत असल्याची प्रतिक्रिया या विभागाकडून व्यक्त करण्यात येत होती.
आयुक्तांच्या आदेशानुसार नगररचनात ‘आॅपरेशन सर्च’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 1:28 AM