शुक्रवारी नाशिक स्मार्ट सिटीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत तज्ज्ञांच्या समितीने होळकर पुला जवळील रिटेनिंग वॉलची पाहणी केली. २०१८ मध्ये निरीला सादर करण्यात आलेला डीपीआर, तसेच तत्कालीन (सन २०१४ साली) महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बनविण्यात आलेल्या गोदावरी प्रदुषण उपसमितीचा अहवाल यांच्या प्रती नाशिक स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी तज्ज्ञांच्या समिती समोर सादर केल्या. त्याचबरोबर गोदावरी नदी पात्राची नैसर्गिक रचनाही तज्ज्ञांच्या समितीला दाखवत सदर रिटेनिंग वॉलचे महत्त्व विशद केले.
रामवाडी पूल ते होळकर पूल या दरम्यान नदी पात्राला वळण असल्यामुळे येथे असलेली गॅबियन वॉल पाण्याच्या माऱ्यामुळे खचणे, खराब होणे अशा प्रकारे नुकसान झाले. तसेच पुर काळात येथे असलेली मलजल वाहिनी खचल्याने त्यातील मलजल नदीमध्ये मिसळत होते, हे तज्ज्ञांच्या समितीच्या निदर्शनास आणून दिले. त्याठिकाणी आता नाशिक स्मार्ट सिटीच्या प्रोजेक्ट गोदा अंतर्गत मलजल वाहिनी बनविण्यात आली आहे. या सर्व गोष्टी पूर काळात पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे प्रभावीत होऊन भविष्यातही मलजलवाहिनी खचून पुन्हा मलजल गोदावरी नदीमध्ये मिसळू शकते, तसेच रामवाडी पूल ते होळकर पुलादरम्यान वळण असल्याने येथील मातीची होणारी धूप रोखणे गरजेचे आहे. या महत्त्वपूर्ण बाबी नाशिक स्मार्ट सिटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तज्ज्ञ समितीच्या निदर्शनास आणून दिल्या.
रामवाडी पुलाकडून पाण्याचा प्रवाह वळण घेऊन होळकर पुलाकडे येतो, त्यामुळे समोरील बाजूची माती पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून जाण्याची शक्यता आहे. हा सर्व अभ्यास करून त्यासंबंधीचा डीपीआर निरी या संस्थेकडे पाठविण्यात आला होता.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या सूचनेनुसार सदर स्थळ निरीक्षण करण्यात आले. यावेळी गोदावरी गटारीकरण विरोधी मंचचे अध्यक्ष निशिकांत पगारे, राजेश पंडित, आर्किटेक्ट कॉलेजच्या प्राचार्या प्राजक्ता बस्ते, कोमल कलावपुडी, तांत्रिक अधिकारी निरी,वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल, सुधीर पगार, जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता यांच्यासह स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल आदी उपस्थित होते.
(फोटो १९ गोदावरी)