नाशिक : महापालिकेत पारंपरिक विभाग म्हणजेच खात्यांबरोबरच आता गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या गोदावरी संवर्धन, ट्रॅफिक सेल, पर्यावरण विभाग, क्रीडा विभाग अशी अनेक नवीन खाती आणि त्या खात्यांचे प्रमुख अर्थात खातेदार वाढणार आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली असून, सर्व विभागाकडून अत्यावश्यक कर्मचारी संख्येची आकडेवारी मागविण्यात आली आहे.वाढत्या शहरीकरणानुसार पालिकेला पारंपरिकता सोडून अन्य विषयांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. त्यानुसार गेल्या काही वर्षांत पालिकेत अनेक नवीन विभाग सुरू करण्याची घोषणा करण्यात आली; परंतु प्रत्यक्षात असे विभाग सुरू झालेले नाहीत. पाच ते सहा वर्षांपूर्वी गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी गोदावरी संवर्धन विभागाची घोषणा तत्कालीन आयुक्तांनी केली होती. त्यासाठी महासभेने केलेला ठराव राज्य शासनाने मान्य केला; परंतु अद्याप हा विभाग कार्यान्वित झाला नाही. हा विभाग वगळता अन्य विभाग सुरू करण्याचे प्रस्ताव केवळ कागदावरच आहेत. यात पर्यावरण विभागात प्रभारी अधिकारी नियुक्त असला, तरी या खात्यात अन्य कर्मचारीच नाहीत. अशाच प्रकारे आरक्षित भूखंड ताब्यात घेण्यासाठी पालिकेच्या वतीने भूसंपादन सेल सुरू करण्यात येणार होता. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. नंतर हा विषय मागे पडला. शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी ट्रॅफिक सेल सुरू करण्यासंदर्भातदेखील अनेकदा चर्चा झाली आणि वाहतूक अभियांत्रिकी शिक्षणक्रम पूर्ण केलेला अधिकारी नियुक्त करण्याबाबत चर्चा झाली ती मागे पडली. गेल्या वर्षी तत्कालीन महापौर अॅड. यतिन वाघ यांनी क्रीडा धोरण तयार करून त्याच्या अंमलबजावणीसाठी क्रीडा विभाग सुरू करण्याची घोषणा केली. त्यानुसार अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संख्येसह हा विभाग सुरू करण्यासाठी पॅटर्न मंजूर झाला; परंतु तोही कागदावरच आहे. नागरिकांकडून नियमांचे पालन करून घेणे आणि अतिक्रमणे हटविण्यासाठी नागरी पोलीस विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. शासनाकडे तो प्रलंबित आहे. महापालिकेच्या प्रशासन विभागामार्फत नवीन खाते सुरू करण्यासंदर्भातील सर्व ठराव संकलित करून त्या खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी नियुक्तीचे ठराव संकलित केले जाणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत नवीन विभाग सुरू करण्याच्या कामास गती मिळणार आहे. (प्रतिनिधी)
पालिकेत वाढणार खातेदार
By admin | Published: October 30, 2014 12:00 AM