नाशिक: शालार्थ प्रणालीमध्ये गैरमार्गाने युजर आयडी वापरून ४७ लाख ४८ हजार रुपयांची रक्कम परस्पर बँक खात्यात वर्ग केल्याप्रकरणी चौघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मंगळवारी लेखा विभागात कागदपत्रांची तपासणी सुरू होती. २०१५ पासून फरक काढण्यात आल्याने यामध्ये अनेकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. दरम्यान, युजर आयडीचा गैरवापर आणि ऑनलाईन रक्कम ट्रान्सफर मुळे या प्रकरणाचा तपास सायबर गुन्हे शाखेकडे वर्ग होण्याची शक्यता आहे.
एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाची अधिकृत मंजुरी नसताना शालार्थ प्रणालीमध्ये गैरमार्गाने युजर आयडी वापरून एका शिक्षकाने ४७ लाख ४८ हजार ६६१ रुपयांची रक्कम तिघा संशयितांच्या मदतीने बँक खात्यात वर्ग केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने याप्रकरणी संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आता प्रकल्प कार्यालयातील कारभार चर्चेत आला असून लेखा शाखेत दिवसभर कागदपत्रांची तपासणी सुरू होती. संबंधितांनी २०१५ पासूनच्या फरकाच्या रकमेपोटी वेळोवेळी रक्कम वर्ग केल्याची बाब समोर आल्याने घोटाळ्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे.चौकशी समितीच्या अहवालानंतर गैरव्यवहाराच्या प्रकरणात तथ्य समोर आल्यानंतर याप्रकरणी प्रकल्प कार्यालयाने मुंबईनाका पोलिसांत फिर्याद दाखल केली. आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक संशयित हर्षल पुंडलिक चौधरी यांच्या बँक खात्यात संशयित गोपीनाथ बोडके, लोकेश पाटील व त्यांचा एक साथीदार यांनी आपापसांत संगनमत करत सुमारे ४७ लाख ४८ हजार ६६१ रुपये वर्ग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.