नाशिक : पंतप्रधानांनी गेल्या वर्षी कोणत्याही पूर्वतयारीशिवाय नोटाबंदीचा निर्णय घाईघाईने घेतला असल्याची टीका विरोधक करीत असले तरी हा निर्णय पूर्वतयारीनेच होता. त्यामुळेच सहा महिन्यांत १७ लाख कोटी रुपयांचे चलन बाजारात आणले गेले, असे मत अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर यांनी व्यक्त केले.रोटरी क्लब आॅफ नाशिकच्या वतीने नोटांबदी वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला गंजमाळ येथील सभागृहात गोविलकर यांचे ‘निश्चलनीकरणाआधी आणि नंतरची आर्थिक स्थिती’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल, मनीषा चिंधडे, हेमंत मराठे, शिल्पा येवला आदी मान्यवर उपस्थित होते. नोटाबंदीसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यात नोटाबंदीनंतर चलनात असलेले सुमारे तीन ते साडेतीन लाख कोटी रुपयांचे काळे धन बॅँकेत जमा होणार नाही अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र संपूर्ण रक्कम जमा झाली. या प्रकारामागे रिझर्व्ह आणि स्थानिक बॅँकेच्या काही उणिवा कारणीभूत आहेत, असे सांगून गोविलकर म्हणाले की, एकूण चलनातील ९९ टक्के नोटा बॅँकेत जमा झाल्या. एक टक्का जमा झाल्या नाहीत. ही एक टक्का रक्कम छोटी नसून १५ हजार पाचशे कोटी रुपये इतकी ही रक्कम असल्याचे ते म्हणाले. नोटाबंदीचा निर्णय घाईत घेतला नव्हता. उलट पूर्वतयारी असल्याने सहा महिन्यांत मोठ्या प्रमाणात चलन उपलब्ध झाले, तसेच चुकीचे व्यवहार करणाºया सुमारे पन्नास लाख व्यक्तींना नोटिसा देता आल्या, असेही ते म्हणाले.
नोटाबंदीवर घाईगर्दीचा आरोप चुकीचाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 1:19 AM