लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पहिलीपासून अभ्यासात हुशार, कायम पुस्तकांमध्ये रमणाऱ्या तिचा उत्तम गुण मिळवीत ८ वी पर्यंत सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे प्रवास सुरू असताना अचानक ‘बोन कॅन्सर’ने तिला गाठले; मात्र शिक्षणाची जिद्द कायम ठेवत तिने आठवी, नववीची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत दहावीचीही परीक्षा दिली. तिला दहावीच्या परीक्षेत ७०.८० टक्केगुण मिळाले असून, डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न आहे. आश्लेषा सूर्यवंशी हे या जिद्दी मुलीचे नाव असून मालेगाव तालुक्यातील मुंगसे गावची रहिवासी असणाऱ्या आश्लेषाला ८ वीत असताना बोन कॅन्सरचे निदान झाले. नाशिकच्या डॉ. भूषण नेमाडे यांच्याकडे तिच्यावर उपचार सुरू झाले. एक वर्ष तिच्यावर रेडिएशन उपचार झाले. पण रेडिएशनचा तिला काही फायदा झाला नाही. दोन वर्षांपासून ती झोपूनच आहे. तिला उठून बसणेही मुश्कील झाले आहे. तिला सुरू असलेला त्रास पाहता तिने अभ्यास करू नये, जास्त ताण घेऊ नये असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पण शिक्षणात खंड पडायला नको यावर ठाम असलेल्या आश्लेषाने दहावीचा अभ्यास चालूच ठेवला. तिच्या शाळेतल्या मैत्रिणी, शिक्षक तिला घरी येऊन भेटत होते, धीर देत होते. घरच्या घरी अभ्यास करुन तिने कॅन्सरच्या वेदना सहन करीत पेपर दिले. दहावीच्या परीक्षेत तिला ७०.८० टक्केगुण मिळाले आहेत.
कॅन्सरवर मात करीत ‘ती’ने मिळवले यश
By admin | Published: June 16, 2017 11:45 PM