नाशिक : एखादी गोष्ट कशी घडली असेल, या गोष्टीत मला प्रचंड स्वारस्य आहे. या जिज्ञासेतूनच आजवर नानाविध विषयांवरील पुस्तकांचे लेखन घडले, अशा शब्दांत प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांनी आपला लेखनप्रवास मांडला. ज्योती स्टोअर्सच्या वतीने आयोजित ‘ग्रंथजत्रा’ या उपक्रमात गोडबोले यांचे ‘माझा लेखनप्रवास’ या विषयावर व्याख्यान, तसेच ‘झपूर्झा’ या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन झाले. इंद्रप्रस्थ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे होते. ‘झपूर्झा’च्या सहलेखिका नीलांबरी जोशी, मनोविकास प्रकाशनाचे संचालक अरविंद पाटकर आदि व्यासपीठावर उपस्थित होते. गोडबोले यांनी प्रारंभी आपल्या ‘झपूर्झा’ या पुस्तकाविषयी सांगितले. विदेशी लेखकांच्या आयुष्यावर या पुस्तकात प्रकाश टाकला असल्याचे ते म्हणाले. या लेखकांची नावे आपण वाचलेली असतात; मात्र ते कसे जगले, त्यांचे आयुष्य कसे होते, याच्या रंजक कथा या पुस्तकात असल्याचे त्यांनी सांगितले. शास्त्रज्ञांच्या रंजक कथा वाचून ‘किमयागार, तर आर्थिक विषयावर सोप्या भाषेतील पुस्तकाची वानवा लक्षात घेऊन ‘अर्थात’ लिहिले. प्रत्येक पुस्तक लिहिण्यामागे कोणती ना कोणती प्रेरणा असते. लिहिण्यासाठी अशा प्रेरणेची ‘किक’ बसल्याशिवाय लिखाण होत नाही, असे गोडबोले म्हणाले. आपल्या अन्य पुस्तकांच्या जन्मकथाही त्यांनी उलगडून सांगितल्या. नीलांबरी जोशी यांनीही पुस्तक लेखनाचा अनुभव मांडला. ‘झपूर्झा’ हा केशवसुतांच्या कवितेतील शब्द असून, सर्जनशीलता व प्रतिभाशक्ती असा त्याचा अर्थ आहे, असे त्या म्हणाल्या. बाळासाहेब पिंगळे, प्रा. पी. एस. पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. ज्योती स्टोअर्सचे संचालक वसंत खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास रसिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कार्यक्रमात बोलताना अच्युत गोडबोले. समवेत व्यासपीठावर वसंत खैरनार, उत्तम कांबळे, नीलांबरी जोशी, अरविंद पाटकर.
By admin | Published: December 24, 2014 12:19 AM