नांदगाव : पाऊस पडत नसल्याने नांदगाव तालुक्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची लक्षणे दिसू लागली असली तरी ठिकठिकाणी पाणीसाठ्यातून शेतीसाठी बेकायदेशीर पाणी उपसा सुरु आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष आमदार पंकज भुजबळ यांनी टंचाई बैठकीत वेधल्यानंतर तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी अखेर नाग्यासाक्या धरणातील अनधिकृतरित्या पाणी उपसणाºया सुमारे २५० वीज पंपांवर कारवाई केली आहे. दरम्यान दरवर्षी जुलै अखेर भरून वाहण्याचा इतिहास असलेल्या माणिकपुंज धरणात केवळ मृत जलसाठा शिल्लक असून या धरणातून नांदगावला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो. बेकायदा पाणी उपश्यामुळे तळ गाठत असलेल्या, पाण्याचा उपसा करतांना नांदगाव शहर पाणी पुरवठा योजनेत अडथळे निर्माण झाले असून. आठ दिवसांनी होणारा पाणी पुरवठा १८ ते २० दिवसांवर येऊन ठेपला आहे. मार्च अखेर पर्यंत पाणी उचलण्याची परवानगी असतांना नियम धाब्यावर ठेवून संबंधित विभागाशी असलेले साटेलोटे यामुळे धरणातले पाणी उपसले गेले आहे. नाग्या साक्या धरणातील वीज पंपांवर कारवाई केल्यानंतर माणिकपुंज धरणाच्या क्षेत्रातील पंप काढून घेण्याच्या सुचना तहसीलदारांनी दिल्या आहेत. मात्र त्यांच्या सूचनेची काटेकोर अंमलबजावणी महत्वाची आहे. पूर्वानुभवावरून अशा सूचना व आदेशांचे पालन होत नसल्याचा इतिहास आहे. प्रत्येक आवर्तन लेट होउ लागल्याने नांदगावकरांनी रस्ता रोको, मोर्चाचे हत्यार उपसले आहे. धरणातून पाणी उपसण्याची अधिकृत मुदत फेब्रुवारीतच संपते. मात्र गेले तीन महिने प्रशासनाने काहीच केले नव्हते. अखेर पंकज भुजबळ यांच्या बैठकीत सदर निर्णय झाला. दरम्यान पाणी टंचाई संदर्भात जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी नांदगांवला काल दुपारी १ वा भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व पाणी टंचाईच्या अडचणी समजुन घेतल्या. नांदगांव येथील भेटीत त्यांच्या समवेत तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, गटविकास अधिकारी जे टी सुर्यवंशी व टंचाई विभागाचे कर्मचारी होते. मात्र राज्य कर्मचाºयांचा संप सुरु असल्याने नांदगांव पंचायत समीती व तहसिल विभागात शुक शुकाट होता तसेच नांदगांव पालिकेच्या कर्मचाºयांनी काळ्याफिती लावून कामकाजात भाग घेतला. नरेश गिते यांनी बैठकीत पाणी प्रश्नावर धरणातील पाणी उपसा प्रकणावर कडक कारवाईच्या सुचना स्थानिक प्रशासनाला दिल्या.
नांदगावी अनधिकृत पाणीउपसा करणाऱ्या २५० वीज पंपांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 12:29 PM