नाशिक : हेल्मेट बाळगणारे मात्र वाहन चालवितांना डोक्यावर परिधान न करणारे तसेच हेल्मेटचा वापर न करणाºया शहरातील तब्बल ७४२ दुचाकीचालकांवर शहर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी (दि़२३) स्पेशल हेल्मेट ड्राइव्हद्वारे कारवाई करून ३ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल केला़ केवळ हेल्मेटच नाही, तर चारचाकी चालविताना सीटबेल्ट न लावणाºया व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ९५९ वाहनधानकांवर कारवाई करून एक लाख ९१ हजार ८०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली़ वाहतूक पोलिसांच्या या कारवाईचा अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना आर्थिक फटका बसला़ पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी गत दोन वर्षांपासून शहरात दुचाकी चालविताना हेल्मेट, तर चारचाकी चालविताना सीटबेल्ट वापरणे अनिवार्य केले़ यासाठी सर्वप्रथम प्रबोधन करून सरकारी कार्यालयात पत्रेही पाठविली व त्यानंतर दंडात्मक कारवाईला सुरुवात केली़ यानंतर शहरातील बहुतांशी वाहनचालकांकडून हेल्मेटचा वापर सुरू झाला असला तरी अजूनही बहुतांशी वाहनचालकांनी याकडे कानाडोळा केला आहे़ या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी संपूर्ण शहरात हेल्मेट ड्राइव्ह राबविला़ यामध्ये शहरातील प्रमुख रस्ते, चौकांमध्ये नाकाबंदी करून दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली़ पोलिसांनी केलेल्या या तपासणीत बहुतांशी दुचाकीचालक कारवाई टाळण्यासाठी हेल्मेट दुचाकीला लटकवून ठेवतात वा जवळ बाळगतात, मात्र डोक्यावर परिधान करीत नसल्याचे दिसून आले़ तसेच बहुतांशी चारचाकीचालक हे सीटबेल्टचा वापर करीत नसल्याचे समोर आले़ संपूर्ण शहरात करण्यात आलेल्या कारवाईत हेल्मेट, सीटबेल्ट व बेशिस्त अशा एक हजार ७०१ वाहनचालकांवर केसेस करून पाच लाख ६२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़ विशेष म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून दंडवसुली केल्यानंतर प्राचार्यांना बोलावून वाहतूक नियमांचे धडेही पोलिसांकडून देण्यात आले़ वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून कारवाई टाळावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी केले आहे़ महाविद्यालय फीचे पैसे दंडासाठीएचपीटी महाविद्यालयाजवळ हेल्मेट परिधान न करणाºया विद्यार्थिनीस अडवून पोलिसांनी पाचशे रुपये दंडाची पावती फाडली़ तिच्याकडे महाविद्यालयाच्या फीसाठीचे केवळ पाचशे रुपये होते. त्यामुळे तिने रडण्यास सुरुवात केली़ असे असतानाही तिने दंडाचे पैसे चुकते केले आणि टोर्इंगवाल्यांनी तिचे वाहन उचलले यामुळे तिला मैत्रिणींकडून पैसे घ्यावे लागले, अशाप्रकारे तिला दुहेरी आर्थिक फटका बसला़मुलीला शाळेत पायी सोडा...शालिमार परिसरातून मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात असलेल्या दुचाकीस्वारास वाहतूक पोलिसांनी अडविले़ त्याने शाळेत सोडण्यासाठी जात असल्याचे सांगताच तुम्ही पायी जा, असा सल्ला देण्यात आला़ अखेर स्वत:जवळील पॅनकार्ड पोलिसांकडे दिल्यानंतर वाहनचालकास मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाऊ देण्यात आले़
‘हेल्मेट ड्राइव्ह’मध्ये ७४२ दुचाकीचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:22 AM