इगतपुरी : राज्य सरकारच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत इगतपुरी शहरातील लाभार्थींनी शौचालय अनुदान घेतले, मात्र यातील काही लाभार्थींनी शौचालय निधीचा गैरवापर केला असून, संबंधित लाभार्थींवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे यांनी दिली आहे. शासन अनुदानाचा गैरवापर केल्याबाबत संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. सदर लाभार्थींनी शौचालयाचे बांधकामे सुरू न केल्याने त्यांच्याविरुद्ध लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी मुंडे यांनी स्पष्ट केले. तसेच नगरपरिषद सर्वेक्षणांती राहिलेल्या लाभार्थींनी सदर अभियानाचा लाभ घेऊन वैयक्तिक शौचालय बांधून घ्यावे व उघड्यावर शौचास जाणे बंद करून नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर )
अनुदानाचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई
By admin | Published: January 24, 2017 12:22 AM