पंचवटी : विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसताना खासगी चारचाकी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सहा वाहनचालकांविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई केली आहे़ या सहाही वाहनांचा परवाना निलंबित करण्याची कारवाई केली जाणार आहे़गत आठवड्यात शालेय विद्यार्थी वाहतूक करणाºया जिल्हा सुरक्षितता समितीची बैठक झाली होती़ या बैठकीत विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसलेल्या खासगी चारचाकी वाहनातून विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनचालकांवर कारवाई केली जाणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी सांगितले होते़ काही दिवसांपासून प्रादेशिक परिवहन विभागामार्फत विनापरवाना विद्यार्थी वाहतूक करणाºया खासगी वाहनधारकांची तपासणी सुरू होती़ या तपासणीमध्ये विनापरवाना सहा चारचाकी वाहने आढळून आली असून, त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यान्वये परवाना निलंबनाची कारवाई केली जाणार आहे़ दरम्यान, पालकांनी आपल्या पाल्याच्या सुरक्षिततेसाठी शालेय विद्यार्थी वाहतुकीचा परवाना असलेल्या वाहनातूनच शाळेत पाठवावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे. तसेच वाहतूक नियमांची पायमल्ली करून विद्यार्थी वाहतूक करणाºया खासगी वाहनचालकांविरुद्ध कारवाई सुरूच राहणार आहे.
विनापरवाना विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सहा वाहनचालकांविरोधात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:05 AM