मालेगाव : भारत निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या विशेष पुनरनिरीक्षणात नेमून दिलेल्या कामामध्ये दिरंगाई, हलगर्जीपणा करणाऱ्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी दिले आहेत. भारत निवडणूक आयोगामार्फत १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरनिरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. याअंतर्गत १७ नोव्हेंबर २०२० रोजी जिल्ह्यातील सर्व पदनिर्देशित ठिकाणी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. १ जानेवारी २०२१ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होणारे नागरिक ज्यांची अद्याप मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही, अशा नवमतदार नोंदणीसाठी पुढे यावे व पदनिर्देशित ठिकाणी नमुना-६ अर्ज भरुन मतदार नोंदणी करण्याचे आवाहन शर्मा यांनी केले. भारत निवडणूक आयोगामार्फत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरनिरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत प्रातांधिकारी शर्मा बोलत होते. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार पी.बी.मोरे, प्रवीण खैरनार यांच्यासह सर्व केंद्रस्तरीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना शर्मा म्हणाले, एकापेक्षा अधिक ठिकाणी नावाची नोंद असलेल्या किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित किंवा मयत मतदारांची नावे वगळण्यासाठी नमुना -७ अर्ज भरता येईल. त्याचप्रमाणे आपल्या नावाच्या तपशिलामध्ये काही त्रुटी असल्यास त्यात आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यासाठी नमुना -८ भरणे, तर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत आपला निवासी पत्ता बदलण्यासाठी नमुना ८ -अ भरता येईल. याबाबतचे दावे, हरकती या ५ जानेवारी २०२१ पर्यंत निकाली काढण्यात येणार असून, १५ जानेवारी २०२१ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसात मतदार यादीच्या शुद्धीकरण मोहिमेसाठी सर्व मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे.
कामामध्ये दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 4:25 AM