- संजय पाठकनाशिक - पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाच्या प्रस्तावित बदलांना विरोध करण्यात आला असून, ही रेल्वे सरळ मार्गानेच न्यावी, अशी मागणी आज मुंबई येथे नाशिक आणि अहिल्यानगर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली. तसेच प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी लाेकप्रतिनिधींची कृती समिती स्थापन करण्यात आली. या बैठकीस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच रेल्वे मंत्रालयाची एकत्रित बैठक घेऊन त्यात चर्चा करण्याचे ठरवण्यात आले.
आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकाराने मुंबईत ही बैठक झाली. या बैठकीला कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, आ. दिलीप वळसे-पाटील आणि आ. अमोल खताळ हे प्रत्यक्ष उपस्थित होते तर खा. राजाभाऊ वाजे, खा. भाऊसाहेब वाकचौरे, खा. अमोल कोल्हे, आ. बाबाजी काळे आणि आ. शरद सोनावणे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीला उपस्थित होते. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे यापूर्वी संगमनेर मार्गे जाणार होती. मात्र, आता शिर्डी मार्गे जाणार असल्याने विराेध करण्यात येत असून जुन्या मार्गासाठी आमदार सत्यजीत तांबे आग्रही आहेत.