वडाळागाव : उपमहापौरांच्या प्रभाग क्रमांक ३८ मधील पखालरोडवरील रॉयल कॉलनीमध्ये डेंग्यूचे सहा रुग्ण आढळून आल्याची घटना उघडकीस आल्याने मनपाच्या आरोग्य विभागाला जाग आली आहे. सदर आढळून आलेले रुग्ण डेंग्यूसदृश असल्याचा दावा प्राथमिक तपासणी अहवालाच्या आधारे आरोग्याधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, येथील हाजी बिल्डवेल या बांधकाम व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई आरोग्य विभागाकडून करण्यात येणार आहे.गेल्या मंगळवारी सकाळच्या सुमारास पाच मुलांसह एका महिलेला डेंग्यू झाल्याची घटना समोर आली. आज आरोग्याधिकारी सुनील बुकाणे यांनी हिवताप विभागाच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन परिसरातील पाणीसाठे तपासले. यावेळी ज्या रो-हाऊसमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळले त्यावरील पाण्याच्या टाकीची हिवताप विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता त्यामध्येही व परिसरात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पाच्या पाणीसाठ्यामध्येही मोठ्या प्रमाणात डेंग्यू आजाराची लागण ज्या डासांपासून होते त्या एडीस डासांची उत्पत्ती आढळून आल्याचे बुकाणे यांनी सांगितले. सकाळी आठ वाजता हिवताप विभागाचे पर्यवेक्षक के. डी. पगार यांच्या मार्गदर्शनाखाली आठ ते दहा कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला व औषध फवारणी के ली, तसेच नागरिकांच्या घरांमधील पाणीसाठ्याचे नमुने तपासले. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे रक्तनमुनेही तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. (वार्ताहर)