मालेगाव : शहरातील स्वस्त धान्य दुकानांपैकी दोन स्वस्त धान्य दुकानांचे परवाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांत खळबळ उडाली आहे.शहरातील स्वस्त धान्य दुकान क्र. ११६ व ७/२ या दोन दुकानांचे प्राधिकारपत्र पुढील आदेश होईपावेतो निलंबित करण्यात आल्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी १८ मे रोजी दिले आहेत. या दोन्ही दुकानदारांविरोधात येथील धान्य वितरण अधिकाऱ्यांनी तपासणीअंती आढळून आलेल्या दोषारोपाच्या अनुषंगाने परवानाधारकांविरुद्ध कारवाई करण्याचा अहवाल २१ मार्च २०१५ रोजी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पाठविला होता. या अहवालावर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी २२ एप्रिल २०१५ रोजी संबंधितास मालेगाव धान्य पुरवठा अधिकाऱ्यामार्फत खुलासा सादर करण्याची नोटीस दिली होती. त्यावर सादर केलेला खुलासा अत्यंत मोघम स्वरूपाचा आहे. तपासणीनंतर त्यात दुरुस्ती करण्यात आल्याचे दिसून आल्याने तसेच सादर केलेला खुलासा सयुक्तिक वाटत नाही. सबब परवानाधारक यांनी प्राधिकारपत्रातील अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्र अनुसूचित वस्तू (वितरणाचे विनिमयन) आदेश १९७५ अन्वये कारवाईस पात्र ठरल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या निलंबन काळात मालेगाव धान्य वितरण अधिकाऱ्यांनी फेरचौकशी करून त्याचा अहवाल सात दिवसात जिल्हा पुरवठा कार्यालयात सादर करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशामुळे अनेकांचे धाबे दणाणले असून, स्थानिक पातळीवर अनियमितता तसेच विविध अटी न पाळणाऱ्या परवानाधारकांत मोठी खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
कारवाई : जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आदेश
By admin | Published: May 22, 2015 11:30 PM