ननाशी : खरीप हंगाम यशस्वी करावा. तसेच चढ्या दराने रासायनिक खतांची विक्री होत असल्याचे आढळल्यास विक्रेत्यांविषयी तत्काळ योग्य त्या आवश्यक पुराव्यानिशी कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. कैलास खैरनार व तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ननाशी परिसरात चालू खरीप हंगामाच्या पूर्वतयारी निमित्त मंडळ कृषी अधिकारी यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते.
यात भात, सोयाबीन या पिकांसाठी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिके, सोयाबीन पिकासाठी घरच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासणी मोहीम, मूलस्थानी जलसंधारण अंतर्गत करावयाचे विविध उपचार, रासायनिक खतांच्या वापरात दहा टक्केपर्यंत बचत करणे, जमीन आरोग्य पत्रिका व सुपिकता निर्देशांकानुसार रासायनिक खतांचा वापर करणे, युरिया ब्रिकेटचा वापर करणे व मागणी नोंदविणे, शेतकऱ्यांच्या बांधावर गटांमार्फत बियाणे व खते पोहोच करणे, सोयाबीनची पेरणी बीबीएफ यंत्राद्वारे करणे, मग्रारोहयो अंतर्गत जास्तीत जास्त प्रमाणात फलोत्पादन पिकांची लागवड करणे, मग्रारोहयो शेततळे योजनेचा लाभ घेणे, भात व नागली पीक प्रकल्प राबवणे, महाडीबीटी अंतर्गत विविध घटकांचे अर्ज करणे व लाभ घेणे इत्यादींबाबत शेतकरी बांधवांमध्ये प्रचार प्रसिद्धी व मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी ललित सूर्यवंशी, पर्यवेक्षक संजय सावंत उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश गवळी, राहुल राऊत, भाऊसाहेब वाघमोडे, उज्वला गावित, योगेश जोपळे यांनी परिश्रम घेतले.