इंदिरानगर : प्रभाग २३, ३०, ३१ मधील चेतनानगर परिसराचा पाणीपुरवठा येत्या ४८ तासांत सुरळीत करा, अन्यथा कारवाईस सामोरे जा, असे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले. या परिसरातील कृत्रिम पाणीटंचाईसंदर्भात महापौर दालनात प्रभागाचे नगरसेवक आणि पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी नगरसेवकांनी इंदिरानगर, राजीवनगर, श्रद्धाविहार कॉलनी, कमोदनगर, परबनगर, वैभव कॉलनीसह प्रभाग २३, ३०, ३१ चेतनानगर परिसरात अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत आहे, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गतवर्षी गंगापूर धरणात अत्यल्प जलसाठा असतानाही पाणीपुरवठा सुरळीत होता. यंदा धरणात मुबलक जलसाठा असतानाही वितरण व तांत्रिक विभाग यांच्यातील नियोजनाअभावी कृत्रिम पाणीटंचाईस नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला आम्हा नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे असे नगरसेवक सतीश कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे, श्याम बडोदे, रूपाली निकुळे, शाहीन मिर्झा, पुष्पा आव्हाड यांनी बैठकीत महापौर यांना सांगितले.यावेळी महापौरांनी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून चढ्ढापार्क व कलानगर येथे जलकुंभ मंजूर करण्याचे आश्वासन दिले. तसेच दर आठवड्यास विभागीय अधिकारी व पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीपुरवठ्या संदर्भात माहिती कळविणे, अभियंत्यांनी स्वत: जलकुंभास भेट देऊन जलकुंभात पाणी किती आहे याची माहिती देणे, कोणतेही कारण न देता याप्रश्नी गांभीर्याने काम करावे अशा सूचना करत येत्या ४८ तासांत पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा कारवाईस सामोरे जा, असे आदेश यावेळी दिले. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे धर्माधिकारी, चव्हाणके, धारणकर, बच्छाव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)इंदिरानगर परिसरातील लोकप्रतिनिधींनी महापौर रंजना भानसी यांची भेट घेऊन पाणीपुरवठासंबंधी समस्या मांडल्या.
पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास कारवाई
By admin | Published: April 20, 2017 12:45 AM