देवळा : डॉ. राहुल अहेर यांनी अवैध उद्योगधंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्याबाबत संबंधित विभागानी योग्य ती कार्यवाही सुरू केल्याने अनधिकृत व्यवसायिकांचे धावे दणाणले आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.विंचूर - प्रकाशा मार्गावरील भाबडघाट ते मंगरूळ फाटा ह्या दरम्यान परराज्यातील मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडून वाहतूक पोलीस अनधिकृतपणे वसुली करत असल्याचे आमदार अहेर यांनी प्रत्यक्ष पाहिले. सदरची बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित पोलिसांना बोलावून ‘परराज्यातील वाहनचालकांची लूट थांबवा व महाराष्ट्र पोलिसांचा अभिमान वाढवा’ असा सल्ला देऊन ह्या भागात मालवाहतूकदारांना होणारा पोलिसांचा त्रास बंद केला. त्याचप्रमाणे गिरणा नदीपात्रात सुरू असलेली अवैध वाळू वाहतूक बंद करण्याचे आदेश डॉ. अहेर यांनी दिलेले असतानादेखील चोरटी वाळू वाहतूक सुरूच असलेली आमदारांच्या निदर्शनास आले. रात्रीच्या वेळी स्वत: जाऊन पाहणी केली व चोरटी वाळू वाहतूक बघितली. त्यांनी तहसीलदार व पोलिसांना सूचना देऊन सदर प्रकार बंद करण्यास सांगितले. (वार्ताहर)
अहेर यांच्या सूचनेनंतर अवैध उद्योगधंद्यांवर कारवाई
By admin | Published: January 24, 2015 11:09 PM