नाशिक : फटाक्यांमुळे होणारी जीवितहानी ही गंभीर बाब असून, निवासी वसाहतीत अवैध दुकाने आणि साठे करणाऱ्यांचे केवळ परवाने रद्द करून चालणार नाही, तर संबंधितांवर आठ दिवसांत कारवाई करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नाशिकमधील एका जनहित याचिकेवर दिले आहेत.नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल लासूरे यांनी रहिवासी क्षेत्रातील फटाक्यांच्या दुकानांविषयी पोलीस आयुक्त आणि अन्य सक्षम यंत्रणेकडे केली होती. मात्र, त्यावर कारवाई होत नसल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल केली होती, त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. प्रत्येक गोष्ट न्यायालयानेच सांगायची असेल तर राज्य सरकार काय करते? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. न्यायमूर्ती विद्यासागर कानडे व स्वप्ना जोशी यांनी हे आदेश दिले आहेत. केवळ नाशिक महापालिकाच नव्हे तर राज्यातील सर्वच पालिकांनी याची दखल घेतली पाहिजे. २५ आॅक्टोबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावे तसेच रहिवासी क्षेत्रात अवैध दुकाने उभारली जाणार नाहीत, याची दक्षता घेण्याचेही निर्देश शासनाला देण्यात आले आहेत. तसेच अवैध फटाके विक्री विरुद्धच्या कारवाईचे काम एका दिवसाचे नाही तर ते सातत्याने चालले पाहिजे, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
फटाक्यांच्या अवैध दुकानांवर कारवाईचे आदेश
By admin | Published: October 20, 2016 2:23 AM