नाशिक : विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाली असून मागील दहा दिवसांमध्ये राज्य उत्पादन शुल्क नाशिक अधिक्षक कार्यालयाकडून अवैध मद्यवाहतूक केल्याप्रकरणी ९१ गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे १४ लाख ९२ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परराज्यातून शहरात येणाऱ्या विविध तालुक्यांमधील रस्त्यांवर विधानसभा निवडणूक कालावधीत करडी नजर ठेवली जात आहे. विशेषत: गुजरात, दमण-दीव, दादरानगर हवेली यांसारख्य केंद्रशासित प्रदेशांमध्ये निर्मित केले जाणारे मद्य राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधीत आहे. याप्रकारच्या मद्याची वाहतूक चोरट्या मार्गाने शहरापर्यंत केली जाते. विधानसभा निवडणूक कालावधीत याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक डॉ. मनोहर अंचुळे यांनी विशेष नियोजनाची आखणी केली असून सर्व सीमा तपासणी नाके पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहे. मद्याची तस्करी रोखण्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येणारी गुन्हे अन्वेषण व मद्यविक्रीची दैनंदिन माहिती क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून घेत दररोज सकाळी विशेष संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जात आहे. त्यानुसार माहिती लेखी स्वरूपात भरून निवडणूक आयोगाला सादर केली जाणार असल्याचे अंचुळे यांनी सांगितले. परवानाधारक मद्यविक्रेत्यांसह संशयित मद्य तस्करींच्या ठिकाणांवरही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून आहे.
‘ड्राय-डे’मध्ये विक्री करणारे रडारवर
मागील तीन वर्षांमध्ये ‘ड्राय-डे’च्या दिवशीदेखील परवानाधारक मद्यविक्रेत्यांपैकी काही विक्रेत्यांनी सर्रासपणे मद्याची मागील दरवाजाने विक्री केल्याच्या तक्रारी राज्य उत्पादन शुल्क विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार अशा संशयित परवानाधारक मद्यविक्रेते विभागाच्या ‘हिटलिस्ट’वर असून त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्यावर वॉच ठेवून विशेष गोपनीय पथक याबाबत सतर्क आहे. तसेच पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षकांकडूनदेखील अवैध मद्यवाहतूक व विक्री करणाºयांची माहिती मागविण्यात आली आहे.१५ विशेष भरारी पथके
विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहीर होताच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून शहरासह जिल्ह्यात १५ विशेष भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली आहे. या पथकांमार्फत सातत्याने सीमावर्ती भागावर लक्ष ठेवून सीमा नाक्यांवर वाहनांची तपासणी केली जात आहे. अद्याप ९१ गुन्हे अवैध मद्यवाहतूकप्रकरणी दाखल करण्यात आले आहे.