नाशिक : बहुचर्चित अंबड-लिंकरोडवरील अतिक्रमित भंगार बाजार हटविण्याची कारवाई दिवाळीनंतर करण्याचे आणि त्यासाठी पोलीस बंदोबस्त मागविला असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली. न्यायालयाने आदेश देऊनही महापालिका अद्यापही ठोस कार्यवाही करू शकलेली नाही. भंगार बाजार हटविण्यासाठी माजी नगरसेवक दिलीप दातीर हे दीर्घकाळापासून न्यायालयीन लढाई लढत आहेत. न्यायालयाने सदर भंगार बाजार हटविण्याची कार्यवाही करण्याचे आदेशित केले होते, परंतु तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनीही पोलीस बंदोबस्त उपलब्ध होत नसल्याचे कारण दर्शवित कारवाईबाबत हतबलता दाखविली होती. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला म्हणून दातीर यांनी गेडाम यांच्यासह मनपा प्रशासनाविरुद्ध अवमान याचिका दाखल केली असून त्याबाबतची सुनावणी नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. तत्पूर्वी, अभिषेक कृष्ण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अंबड-लिंकरोडवरील भंगार बाजारातील अतिक्रमित बांधकामांचे पुन्हा डिमार्केशन केले. सदर काम पूर्ण झाल्यानंतर आता महापालिकेने पोलीस आयुक्तालयाला अहवाल पाठवत बंदोबस्ताची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
भंगार बाजारावर दिवाळीनंतर कारवाई
By admin | Published: October 26, 2016 11:32 PM